Advertisement

पाणी, डेब्रीज,घनकचरा वाहणारी खासगी वाहनंही व्हीटीएमएसच्या कक्षेत - पालिका

घनकचरा वाहून नेण्यासाठी २ हजार ६२८, नाल्यातून गाळ वाहून नेण्यासाठी ७७१, मलनिस्सारण विभागाची ६० अशी एकूण ३ हजार ४५९ वाहनं आहेत. यातील काही वाहनांमध्ये व्हीटीएमएस उपकरण बसवण्यात आली आहेत. मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर वाहनं व्हीटीएमएसच्या कक्षेत आलेली नाहीत.

पाणी, डेब्रीज,घनकचरा वाहणारी खासगी वाहनंही व्हीटीएमएसच्या कक्षेत - पालिका
SHARES

मुंबई महानगर पालिकेकडून पाणी, घनकचरा, गाळ, डेब्रीज वाहून नेण्यासाठी स्वत:च्या मालकीच्या वाहनांसह खासगी वाहनांचाही वापर केला जातो. मात्र, ही वाहनं ठरवून दिल्याप्रमाणेच काम करत आहेत का, निर्धारित मार्गानं आणि ठरलेल्या ठिकाणीच जात आहेत का, त्यांच्या फेऱ्या ठरल्याप्रमाणेच होत आहेत का याची अचूक माहिती पालिकेपर्यंत येतेच असं नाही. त्यामुळे आता अशी सर्व अचूक माहिती मिळावी यासाठी पालिकेनं अशा खासगी वाहनांना व्हीटीएमएस अर्थात व्हेईकल ट्रॅकिंग माॅनिटरींग सिस्टीमच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन खात्याचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली आहे.


स्वतंत्र नियंत्रण कक्ष 

पालिकेसाठी अशी सेवा देणाऱ्या खासगी वाहनधारकांना वाहनांना व्हीटीएमएस उपकरण बसवणं बंधनकारक असणार आहे. तर व्हीटीएमएस उपकरण बसवलेल्या खासगी वाहनांचे संगणकीय आणि जीपीएस आधारित सनियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र असा नियंत्रण कक्ष पालिकेकडून लवकरच स्थापन करण्यात येणार असल्याचंही शंकरवार यांनी सांगितलं आहे.


यंत्रणा नाही

पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेकडे २८ टँकर असून या वाहनांना व्हीटीएमएस उपकरण बसवण्यात आली आहेत. तर जलअभियंता खात्याच्या अखत्यारितील इतर ३२४ वाहनांना लवकरच व्हीटीएमएस उपकरण बसवण्यात येणार आहे. त्याचवेळी पालिका क्षेत्रात सुमारे ४ हजार वाहनं डेब्रीज वाहून नेण्याचं काम करतात. मात्र या वाहनांकडून डेब्रीज नियोजित वेळेत आणि नियोजित ठिकाणीच टाकलं जात आहे का याची कोणतीही खातरजमा करणारी यंत्रणा पालिकेकडे नाही.


व्हीटीएमएस बंधनकारक

घनकचरा वाहून नेण्यासाठी २ हजार ६२८, नाल्यातून गाळ वाहून नेण्यासाठी ७७१, मलनिस्सारण विभागाची ६० अशी एकूण ३ हजार ४५९ वाहनं आहेत. यातील काही वाहनांमध्ये व्हीटीएमएस उपकरण बसवण्यात आली आहेत. मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर वाहनं व्हीटीएमएसच्या कक्षेत आलेली नाहीत. त्यामुळं या सर्व वाहनांना व्हीटीएमएस बसवणं पालिकेनं आता बंधनकारक केलं आहे.


ग्रँट रोडमध्ये नियंत्रण कक्ष

काही वाहनांना व्हीटीएमएस उपकरण बसवण्यात आली असली तरी या वाहनांच्या मार्गाचे व फेऱ्यांचे संनियंत्रण करण्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष नव्हता. त्यामुळं या वाहनांवर काटेकोर नजर ठेवण्यावर शेवटी मर्यादा येतच होत्या. ही बाब लक्षात घेत पालिकेनं मध्यवर्ती नियंत्रण कक्ष स्थापण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यानुसार ग्रँट रोड परिसरात असणाऱ्या पालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या कार्यालयातील जागेवर नियंत्रण कक्ष उभारण्याचं काम पालिकेकडून सुरू असून हे काम आता अंतिम टप्प्यात आहे.


 ३६५ दिवस कक्ष 

लवकरच हा कक्ष सुरू होणार असून ३६५ दिवस हा कक्ष कार्यरत राहणार असल्याचंही शंकरवार यांनी सांगितलं आहे. चार पाळीत या कक्षात कर्मचारी-अधिकारी काम करणार आहेत. तर या कक्षामुळे यापुढे वाहनांचं योग्य ते सनियंत्रण होणार असल्याचा विश्वास शंकरवार यांनी व्यक्त केला आहे.



हेही वाचा -

रखडलेला धारावी पुनर्विकास मार्गी लागणार... विशेष प्रकल्पाचा दर्जा

दहावी परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत ५ नोव्हेंबरपर्यंत




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा