स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरेंनी आता चांगलीच कंबर कसली आहे. ठाकरेंनी पक्षाची संघटनात्मक रणनीती आखण्यास त्यांनी सुरुवात केल्याचे दिसत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पक्षाचे नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत.
आज त्यांनी मुंबईत (mumbai) शाखाप्रमुखांची बैठक घेतली यामध्ये ठाकरेंनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी महापालिका निवडणुकीसाठी उपस्थितांना कानमंत्र दिला आहे. जो आपल्यासोबत येईल त्याला शंभर टक्के साथ द्या, मुंबईतील सर्व वॉर्डमध्ये तयारी ठेवा, युतीचा निर्णय आम्ही घेऊ, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे
उद्धव ठाकरेंनी (uddhav thackeray) शिवसेना भवनात शाखाप्रमुखांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी ठणकावून सांगितले की, 'जे सोडून गेले त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नाही. मात्र जो आपल्यासोबत येईल त्याला शंभर टक्के साथ द्या. मनसेसोबत (mns) सध्या चर्चा सुरु आहे, युतीबाबत (alliance) आम्ही निर्णय घेऊ.'
दोन्ही ठाकरेंच्या मनोमिलनाबाबत बोलताना ते म्हणाले, 20 वर्षांनंतर दोन्ही भाऊ एकत्र आलो आहोत, मनसेसोबत (mns) युतीची चर्चा सुरू आहेच. तुम्ही सर्व वॉर्डमध्ये आपल्या पक्षाची तयारी ठेवा, लोकांच्या संपर्कात राहा, दुबार मतदानावर लक्ष द्या. फार तर फार 100 दिवस उरलेत कामाला लागा, असे आदेशही उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.
तर ठाकरेंनी यावेळी विरोधकांनाही लक्ष्य केले. विरोधकांना आपल्याला या निवडणुकीत गाडायचं आहे, भाजपने आपला पक्ष आणि चिन्ह चोरले. भाजप आणि मुख्यमंत्री आपल्यावरच टीका का करतात? लक्षात घ्या, टीकेला फक्त ठाकरेच लागतात याचे महत्त्व समजून घ्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महापालिका (bmc) निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागल्याचे चित्र आहे. मात्र निवडणुका आणखी चार महिन्यांनी लांबणार आहेत. जानेवारीत निवडणुका होणे अपेक्षित आहे. मात्र पक्षबांधणीच्या कामांना आतापासूनच वेग आला आहे.
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या भेटी वरचेवर वाढल्या आहेत, कटूता दूर होऊन त्यांचे संबंध घट्ट होत असल्याचे चित्र आहे, त्यामुळे युतीच्या चर्चंना बळ मिळत आहे. गेल्या दोन महिन्यात तब्बल चार वेळा दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये भेट झाली आहे.
गेल्या आठवड्यात राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दोन्ही बंधूंची भेट झाली. यावेळी दोघांमध्ये दीर्घ चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे राजकारणात काय नवे घडणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
हेही वाचा