Advertisement

पुलांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी ९६१ कोटींची तरतूद

पुलांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी महापालिकेनं २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात ९६१ कोटींची तरतूद केली आहे.

पुलांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी ९६१ कोटींची तरतूद
SHARES

मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरीतील गोखले पूल आणि हिमालय पूल दुर्घटनांनंतर महापालिकेच्या पूल विभागानं मुंबईतील सर्वच उड्डाणपूल आणि रेल्वेवरील पुलांच्या देखभालीकडं विशेष लक्ष देण्याचं ठरवलं आहे. पुलांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी महापालिकेनं २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात ९६१ कोटींची तरतूद केली आहे.

येत्या काळात मुंबईत आणखी ६ नवीन पूलही उभारण्यात येणार आहेत. जुलै २०१८ मध्ये अंधेरीतील गोखले पुलाचा काही भार रेल्वे ट्रॅकवर पडून झालेल्या दुर्घटनेत २ जण दगावले होते. पश्चिम रेल्वेची वाहतूकही एक दिवस बंद ठेवावी लागली होती. त्यानंतर महापालिकेनं रेल्वे रुळांवरील सगळ्याच पुलांचं सर्वेक्षण केलं. १४ मार्च २०१९ ला छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाजवळच्या हिमालय पूल दुर्घटनेत ६ जणांचा बळी गेला.

पुलांच्या सर्वेक्षणात सुचवल्याप्रमाणं पालिकेनं पुलाच्या दुरुस्तीची कामं मोठ्या प्रमाणावर हाती घेतली. त्यानुसार, मुंबईतील २१ लहान मोठे जीर्ण पूल पाडून त्यांची पुनर्बांधणी करण्याचं काम हाती घेतलं आहे. तसंच, ४७ पुलांच्या मोठ्या संरचनात्मक दुरुस्त्या व १४४ पुलांच्या किरकोळ दुरुस्त्या करण्याच काम प्रगतिपथावर आहे.

मुंबईतील एकूण ३४४ पुलांची देखभाल पालिकेतर्फे केली जाते त्यात उड्डाणपूल, रेल्वेवरील पूल यांचाही समावेश आहे. रेल्वे प्राधिकरण आणि महापालिका यांच्यात हद्दीचा वाद नेहमीच असतो.  मात्र आता मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे यांनी आयआयटीमार्फत केलेल्या संरचनात्मक सर्वेक्षणाच्या अहवालानुसार रेल्वे रुळांवरील पूल व रेल्वे रुळांखालील भुयारी वाहतूक मार्गांची कामे ‘महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ या संस्थेमार्फत करण्याचं ठरवलं आहे.

११ रेल्वे रुळांवरील पूल व एक रेल्वे रुळांखालील भुयारी मार्गाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. त्यात दादर स्थानकावरील टिळक पूल व रे रोड रेल्वे स्थानकावरी पूल यांचा समावेश आहे. या पुलांचं बांधकाम येत्या ३ वर्षांत करण्यात येणार आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांनी पादचारी पुलांची पुनर्बांधणी, लोअर परेल येथील रेल्वे पूल,  ग्रँटरोड स्थानकावरील फेरारे पुलावर पुन्हा गर्डर टाकणे, भायखळा रेल्वे पुलाची दुरुस्ती ही कामे हाती घेतली आहेत.

त्याकरिता रेल्वे प्राधिकरणाने पालिकेकडून ७०० कोटींची मागणी केली आहे. त्याकरिता २०२०-२१ च्या सुधारित अर्थसंकल्पात २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे तर येत्या अर्थसंकल्पात आणखी २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबईत ७ नवीन पूल उभारण्यात येणार असून, हे सर्व पूल पश्चिम उपनगरातील आहेत. त्यात मढ-वर्सेवा खाडी पूल, मार्वे मनोरी पूल, ओशिवरा नदी व मालाड खाडीवरील पूल, एव्हरशाइन नगर ते मार्वे रोड येथे रामचंद्र नाल्यावरील पूल, लगून रोड ते इन्फिनिटी मॉल येथील पूल आणि मार्वे रोड येथील धारीवली गावातील पूल. त्यामुळे मालाड आणि अंधेरी जोडले जाणार आहे. तर मढ-मार्वे ही गावेदेखील जोडली जाणार आहेत.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा