Advertisement

सिमेंट, डांबरी रस्त्यांसह चौकांची कामेही कासवगतीनेच!


सिमेंट, डांबरी रस्त्यांसह चौकांची कामेही कासवगतीनेच!
SHARES

मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात मुंबईतील रस्त्यांच्या विकासासाठी दरवर्षी केल्या जाणाऱ्या तरतुदीपेक्षा मागील वर्षी ३० ते ३५ टक्के एवढ्याच निधीची तरतूद करण्यात आली होती. पण आर्थिक वर्ष संपायला अवघे दोन महिने शिल्लक असतानाही रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात महापालिकेला यश आलेलं नाही. आजपर्यंत केवळ ६०० रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असून ५४१ कामांना हातही लावण्यात आलेला नाही. याशिवाय एकूण चौकांपैकी केवळ २१ कामेच हाती घेण्यात आली आहेत. पण ती कामेही पूर्णत्वास आलेली नाही.


कमी निधीची तरतूद

रस्ते विभागासाठी सन २०१६-१७च्या अर्थसंकल्पात २ हजार ८८६ कोटी रुपयांची तरतूद केली होती. दरवर्षी सरासरी अडीच हजार कोटी रुपये एवढी रक्कम रस्ते विकासासाठी अर्थसंकल्पात केली जाते. पण सन २०१७-१८च्या अर्थसंकल्पात ही तरतूद १ हजार ९५ कोटी रुपये एवढी करण्यात आली होती. रस्त्यांच्या पुनर्बांधकामाऐवजी पृष्ठभागावरील थर काढून त्यावर पुन्हा डांबराचा थर चढवून रस्त्यांची कामे जलदगतीने करण्यासाठी कमी निधीची तरतूद करण्यात आली होती.


कृती शून्य

रस्त्यांच्या पुनर्बांधकामासाठी प्रती चौरस मीटरसाठी ३५०० ते ४५०० रुपये एवढा खर्च येतो. त्या तुलनेत खराब रस्त्यांच्या पृष्ठभागाचा थर काढून विकास केल्यास त्याच्या प्रति चौरस मीटरसाठी १३७० ते २८०० एवढा खर्च येतो. त्यामुळे पैसाही वाचेल आणि रस्त्यांची कामेही लवकर होतील, असा अंदाज महापालिका प्रशासनाने वर्तवला होता. पण प्रत्यक्षात त्याचा परिणाम रस्त्यांच्या विकासकामांवर दिसून आलेला नाही.


तरतूद मंजूर, कामं नाहीत

महापालिकेने प्राधान्यक्रम दोनमध्ये ९३८ रस्ते, १६३ सिमेंट काँक्रिट आणि ६९१ डांबरी रस्त्यांची कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यातील चालू आर्थिक वर्षात १५ कि. मी. लांबीच्या २५ सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांसाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली होती. तर १२५ कि. मी. लांबीच्या २१६ रस्त्यांसाठी ५८२ कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली होती. पण ही तरतूद केलेल्या रस्त्यांची काही कामे प्रगतीपथावर आहेत, तर काहींना हातही लावलेला नाही.


५४१ कामे निविदा प्रक्रियेत अडकली

प्रकल्प आणि प्राधान्य दोनमध्ये मिळून एकूण १७८५ रस्त्यांची कामे निश्चित करण्यात आली. पण यापैकी मे २०१७ ते आतापर्यंत ६४४ रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. तर आतापर्यंत ६०० कामे प्रगतीपथावर असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तर ५४१ कामे ही निविदा प्रक्रियेत अडकली आहेत. विशेष म्हणजे प्राधान्यक्रम दोन मधील ९३८ कामांपैकी अनेक रस्त्यांची कामे वगळण्यात आली, तसेच काही कामे प्रकल्प कामांमध्ये समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे या रस्त्यांची संख्याही कमी झाली होती.


चौकांची कामंही अपूर्ण

यावर्षी मुंबईतील ६९ चौकांची सुधारणा मास्टिक असफाल्टने करण्याचा निर्णय घेतला होता. त्यातील प्राधान्याने २७ चौकांचीच कामे हाती घेण्यात येणार होती. पण प्रत्यक्षात २१ चौकांच्या कामांना सुरुवात झाली आहे. पण यापैकी एकाही चौकांचं काम पूर्ण झालेलं नाही.


६०० रस्त्यांची कामे प्रगतीपथावर

यासंदर्भात रस्ते प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांना विचारले असता त्यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला. काही महिन्यांपूर्वी खडीच्या पुरवठ्याबाबत अडचण निर्माण झाल्यानंतर रस्त्यांची कामे रखडली होती. पण त्यानंतर या कामांना गती देण्यात आलेली आहे. यावर्षी निश्चित केलेल्या सिमेंट काँक्रिटचे १५ रस्ते आणि डांबरी २१६ रस्त्यांच्या कामांसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर काहींची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या मान्यतेनंतर या सर्व कामांना कार्यादेश दिला जाईल. सध्या ६०० रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. तर ५४१ रस्त्यांची कामे ही निविदाप्रक्रियेत तसेच स्थायी समितीच्या मंजुरीच्या प्रक्रियेत असल्याचे ते म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा