Advertisement

ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावली नाही, मंत्रालयासह १४१ इमारतींना १० हजारांचा दंड

मुंबईत १०० किलोपेक्षा अधिक ओला कचरा निर्माण करणाऱ्या २०९ सोसायटी असून या सर्वांना ओल्या कचऱ्याची विल्हेवाट स्वत: च लावण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष करणाऱ्या मंत्रालय, बाॅम्बे हाॅस्पिटसहित १४१ इमारती आणि सरकारी कार्यालयांना महापालिकेने १० हजार रुपयांचा दंड ठोठावत दणका दिला आहे.

ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावली नाही, मंत्रालयासह १४१ इमारतींना १० हजारांचा दंड
SHARES

मुंबईत १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या इमारती तसेच हॉटेलांना ओल्या कचऱ्यांची विल्हेवाट स्वत:च लावण्याचे निर्देश महापालिकेने दिले आहेत. मात्र महापालिकेच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं सोडून त्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष करणाऱ्या मंत्रालय, बाॅम्बे हाॅस्पिटसहित १४१ इमारती आणि सरकारी कार्यालयांना महापालिकेने १० हजार रुपयांचा दंड ठोठावत दणका दिला आहे.


दंड आकारणी का?

मुंबईत १०० किलोपेक्षा अधिक ओला कचरा निर्माण करणाऱ्या २०९ सोसायटी असून या सर्वांना ओल्या कचऱ्याची विल्हेवाट स्वत: च लावण्याचे आदेश देण्यात आले होते. ऑक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करणं अपेक्षित होतं. परंतु यापैकी ६८ सोसायटींनी मुदतवाढ मागवून घेत आपण कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. परंतु १४१ सोसायट्यांकडून कुठलाही प्रतिसाद न आल्याने या सर्व सोसायट्यांना महापालिकेने नोटीस बजावून त्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.


महापालिकेचं म्हणणं काय?

महापालिकेच्या घनकचरा विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, या १४१ सोसायटीला नोटीस जारी करून प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड आकारल्याचं सांगितलं. या नोटीसच्या माध्यमातून सर्व सोसायटींना ३ जानेवारीपर्यंतची मुदत दिलेली आहे. या कालावधीत त्यांनी ओला कचरा विल्हेवाटीसंदर्भात कार्यवाही न केल्यास पुढील कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.


कुठल्या इमारतींचा समावेश?

दंड आकारण्यात आलेल्या सोसायटींपैकी मंत्रालय ही शासकीय इमारत असून त्यापाठोपाठ बाॅम्बे हाॅस्पिटल, सारंग इमारत, समता इमारत, बजाज भवन, मेकर टाॅवर ३-४-५, सी पॅलेस, माॅन्डेगर, समता पारसी अग्यारी या इमारती आणि हाॅटेल रेसिडेन्सी, कॅफे मेट्रो, शिवसागर आदी. हॉटेल्सचा समावेश आहे. एकट्या 'ए' विभाग कार्यालयाच्या हद्दीतच ३४५ मेट्रीक टन ओला कचरा निर्माण होत असतो. या सर्वांना यापूर्वी सूचना देऊन ओला कचरा विल्हेवाटीसंदर्भात विशेष कार्यशाळाही घेण्यात आली होती, असंही दिघावकर यांनी स्पष्ट केलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा