Advertisement

सर्व जुन्या शौचालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : सभागृहाची मागणी


सर्व जुन्या शौचालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : सभागृहाची मागणी
SHARES

भांडुप येथे शौचालयाची टाकी खचून झालेल्या दुघर्टनेचे तीव्र पडसाद शुक्रवारी महापालिका सभेत उमटले. खासगी जागा असो, शासकीय अथवा महापालिकेची जागा असो. सर्व ठिकाणच्या शौचालयांची देखभाल करणं हे महापालिकेचं कर्तव्य आहे, अशा शब्दांत सर्व सदस्यांनी प्रशासनाचा समाचार घेतला. यावेळी सर्वच सदस्यांनी मुंबईतील सर्वच जुन्या शौचालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली आहे.


निरपराध नागरिकांचे बळी का?

भांडुप पश्चिम येथील टँक रोड, पाटीलवाडी साई सदन चाळ येथील चाळ मालकाने बांधलेले जुने शौचालय अचानक खचल्यानं दोन नागरिकांना प्राण गमवावे लागले. यापूर्वी अशा प्रकारची घटना मानखुर्द येथेही घडली होती. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्यामुळे अनेक जुन्या शौचालयांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. झोपडपट्टीमधील अनेक सार्वजनिक शौचालये दुरवस्थेत आहेत. त्यामुळे जवळपास २२ शौचालयांची दुरुस्ती प्रलंबित आहे. या सर्व शौचालयांची दुरुस्ती व देखभाल कोणी करावी? या वादामध्येच निरपराध नागरिकांचे बळी जात असल्याचे सांगत सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी निवेदन केलं. यावेळी त्यांनी लॉट ११मध्ये दोन शौचालयांमध्ये कमी जागा राखली जात असल्याचे सांगत याबाबत पूर्वीचंच धोरण अवलंबलं जावं, अशी मागणी केली.


'आधी मलवाहिन्या टाका'

याला पाठिंबा देत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मुंबईत तब्बल ३५ हजार सार्वजनिक शौचालये असून महापालिकेने आधी प्रत्येक विभागांमध्ये मलवाहिन्या टाकाव्यात, म्हणजे नागरिकांना घरोघरी शौचालये देता येतील, असे सांगितले. तसेच जी जुनी शौचालये आहेत, त्यासर्वांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी केली.


'नगरसेवकांना दुरूस्तीचीही परवानगी नाही?'

मुंबईत ६० टक्के शौचालये ही आमदार व खासदार निधीतून म्हाडाच्या माध्यमातून बांधली गेली आहेत. मात्र, आमदार व खासदारांना शौचालय बांधण्यास परवानगी मिळते, परंतु नगरसेवकाला साधी दुरुस्ती करण्याचीही परवानगी दिली जात नाही, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी खंत व्यक्त केली. त्यामुळे झोपडपट्टी भागातील सर्व शौचालयांबाबत प्रशासनाने गंभीरतेने लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.


मलकुंडातील गाळ काढणार कधी?

भांडुपमधील दुघर्टना झालेल्या शौचालयाच्या दुरुस्तीसाठी तत्कालीन शिवसेना नगरसेविका स्नेहलता दळवी यांनी विकास निधी मंजूर करून घेतला होता. परंतु, त्यांना तो खर्च करून दिला नसल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगून जिथे जिथे जुनी शौचालये आहेत, त्यांना भेटी देऊन त्यांचा सर्वे करा आणि त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली. तसेच शौचालयांच्या मलकुंडातील गाळ वर्षातून तीन वेळा काढणे आवश्यक आहे. परंतु, तीन वर्षांतून एकदाही साफ केला जात नसल्याचं त्यांनी सांगितलं.


गाळ काढण्यासाठी वाहनंच नाहीत?

अँटॉप हिलमधील एक शौचालय नादुरुस्त अवस्थेत असून ते पाडून नवीन बांधण्याचे आदेश तत्कालीन अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी दिल्यानंतरही ते अद्याप होत नसल्याची खंत माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी व्यक्त केली. तसेच, मलकुंडातील गाळ काढण्यासाठी वाहनंच उपलब्ध नसून ती उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. तर सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांनी स्पार्क तसेच अन्य संस्थेच्यावतीनं बांधलेल्या सर्व शौचालयांचा सर्वे करण्याची मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत स्थानिक नगरसेविका साक्षी दळवी यांच्यासह विविध पक्षांच्या ३६ सदस्यांनी भाग घेतला होता.



हेही वाचा

शौचालय महिलांचं, घुसले पुरूष!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा