विकास आराखड्यासाठी महापालिकेला 2 महिन्यांची मुदत

 Mumbai
विकास आराखड्यासाठी महापालिकेला 2 महिन्यांची मुदत

मुंबई - मुंबईचा विकास आराखडा 2014-34 च्या नियोजन समितीने सादर केलेल्या अहवालावर चर्चा आणि अभ्यास करण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलीय. हा ठराव महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आला. ठराव लवकरच राज्यसरकारकडे पाठवला जाणार असून सरकारने मुदतवाढ दिल्यास नवीन नगरसेवकांना विकास आराखड्याचा अभ्यास करता येणार आहे.

मुंबईच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत लोकांच्या हरकती आणि सूचनांचा विचार करण्यासाठी नेमलेल्या सहा सदस्यांच्या नियोजन समितीने आपला अहवाल 6 मार्चला तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांना सादर केला. या अहवालावर पुढील दोन महिन्यात अभ्यास आणि चर्चा करून तो सरकारला सादर करणे बंधनकारक आहे. परंतु यासाठी सरकारने दिलेली मुदत हि 20 मार्चपर्यंतच असल्यामुळे प्रत्यक्षात नगरसेवकांना 12 दिवसांचाच अवधी मिळणार होता. पण प्रत्यक्षात सभागृहात हा प्रस्ताव 17 मार्चला मांडण्यात आला. त्यामुळे नगरसेवकांना 3 दिवसच मिळत असल्याने स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी सभागृहातील नवीन नगरसेवकांना विकास आराखड्याचा अभ्यास करता यावा म्हणून 2 महिन्यांची मुदतवाढ मिळावी अशी मागणी उपसूचनेद्वारे केली. महापालिकेत याबाबत ठराव करून सरकारला पाठवण्यात यावा अशी सूचनाही कोरगावकर यांनी केली. याला काँग्रेस गटनेते रावीराजा यांनी पाठिंबा देत ही मुदत 90 दिवसांची अर्थात 3 महिन्यांची करावी अशी मागणी केली. परंतु भाजपा गटनेते मनोज कोटक, सपाचे गटनेते रईस शेख यांनी कोरगावकर यांच्या उपसूचनेला पाठिंबा दिला. त्यामुळे उपसूचना मंजूर करून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हा ठराव राज्यसरकारला मुदतवाढीसाठी पाठवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यामुळे आयुक्तांच्या मंजुरीने हा ठराव नगरविकास खात्याकडे पाठवला जाणार आहे. दरम्यान, सरकारकडून महापालिकेला मुदतवाढ मिळेल, असा विश्वास विकास नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Loading Comments