Advertisement

कमला मिल आग: सर्वकाही सुरळीत, मनसेच्या तक्रारीवर महापालिकेचं उत्तर


कमला मिल आग: सर्वकाही सुरळीत, मनसेच्या तक्रारीवर महापालिकेचं उत्तर
SHARES

लोअर परळ येथील कमला मिल्स कंपाऊंडमधील आगीच्या घटनेनंतर मुंबई महापालिकेचा ढिसाळ कारभार समोर येत आहे. या इमारतीत अग्निसुरक्षेचे नियम पाळण्यात आले नव्हते, यासंबंधातील तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मंगेश कशाळकर यांनी नोंदवली देखील होती. मात्र मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती कशाळकर यांनी दिली.


अवैध गोष्टी नसल्याचं उत्तर

कमला मिल्स कंपाऊंडमध्ये रुफ टॉपवर बांधकाम करण्यात आलं होतं, ज्याला परवानगी नाही. शिवाय आगीसंदर्भातील जे ३५ नियम असतात, तेही पूर्ण न केल्याचं दिसून येत होतं. या विरोधात मनसे कार्यकर्ते मंगेश कशाळकर यांनी १० ऑक्टोबर २०१७ रोजी कमला मिल्स कंपाऊंडसंदर्भात मुंबई महापालिकेकडे तक्रार केली होती. मात्र त्यावर त्यांना पालिकेकडून काहीच उत्तर मिळाले नाही. उत्तर न मिळाल्याने त्यांनी दोन वेळा पाठपुरावाही केला. पण पोस्टाने उत्तर पाठवल्याचं सांगत तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्यानंतर कमला मिल्स कंपाऊंडमध्ये कोणत्याही प्रकारचं अवैध बांधकाम नसल्याचं, सगळं सुरळीत असल्याचं उत्तर कशाळकरांना बीएमसीकडून देण्यात आलं.


पीआयएल दाखल करणार

आता मुंबई महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे अनेकांना जीव गमावावा लागला आहे, त्यामुळे खोट्या उत्तरादाखल आम्ही या प्रकरणातील दोषींवर पीआयएल दाखल करणार असल्याची माहिती कशाळकर यांनी दिली. या प्रकरणी आम्हाला संपूर्ण महापालिका प्रशासनाविरोधात लढावं लागणार असलं, तरी आम्ही त्यासाठी तयार आहोत, असं उत्तर त्यांनी दिलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा