Advertisement

मेट्रो ३ प्रकल्पाला भूखंड देणारच नाही, १५ भूखडांचा प्रस्ताव शिवसेनेने फेटाळला


मेट्रो ३ प्रकल्पाला भूखंड देणारच नाही, १५ भूखडांचा प्रस्ताव शिवसेनेने फेटाळला
SHARES

‘मुंबई मेट्रो-३’ अर्थात कुलाबा- वांद्रे- सिप्झ या मेट्रो प्रकल्पांसाठी खेळाची आठ मैदाने आणि उद्यानांसह महापालिकेचे १७ भूखंड ३० वर्षाच्या भाडेकरारावर देण्याचा प्रस्ताव यापूर्वी फेटाळणाऱ्या सुधार समितीने पुन्हा एकदा मेट्रोला आणखी १५ भूखंड देण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे सरकारने मेट्रोसाठी जागा ताब्यात घेण्यासाठी रितसर प्रस्ताव आणायचा आणि महापालिकेने तो फेटाळायचा असा खेळ खेळत शिवसेनेने पुन्हा एकदा मेट्रोवरून भाजपाला रंग दाखवला आहे.

मुंबई मेट्रो ३ साठी आझाद मैदानांसह ११ भूखंडांची तात्पुरती आणि ४ भूखंडांची कायमस्वरुपी मागणी सरकारने महापालिकेकडे केली आहे. या भूखडांचा प्रस्ताव सुधार समितीपुढे मंजुरीला आल्यावर समिती अध्यक्षांनी सर्व जागांची पाहणी करण्यासाठी हा प्रस्ताव राखून ठेवला. बुधवारी झालेल्या सुधार समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीला आल्यावर, शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी हा प्रस्तावच अर्धवट असून तो पूर्ण स्वरुपात आणावा, अशी मागणी करत हा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवण्याची मागणी केली.

आझाद मैदानावरील महापालिकेच्या क्रीडा भवनाच्या खालून मेट्रोचा भुयारी मार्ग जाणार आहे. त्यामुळे क्रीडा भवनाचा बांधकाम स्थैर्यता अहवाल तयार करावा. तसेच जेएसएस रोडवर धोकादायक शालेय इमारतीत मासळी बाजार हलवून, महालक्ष्मी येथील वृद्धाश्रमाच्या इमारतीला खेटून बांधकाम करत लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप स्वप्नील टेंबवलकर यांनी केला.

तर भाजपाचे प्रकाश गंगाधरे यांनी मुंबईच्या हिताच्यादृष्टीने हा महत्वाचा प्रकल्प असल्याने तो मंजूर करण्यात यावा, अशी मागणी केली. परंतु मेट्रो दिसली की तुम्हाला राजकारण दिसते, असा टोलाही त्यांनी शिवसेनेला मारला.


माझीही होते झोपमोड

मेट्रोचे काम रात्रीच्यावेळी होऊ नये, असे न्यायालयाचे आदेश आहेत. परंतु त्याचे पालन केले जात नसून रात्री अपरात्री सुरु माहीममध्ये सुरू असलेल्या या बांधकामामुळे आपलीही झोपमोड होत असल्याची खंत शिवसेना नगरसेवक मिलिंद वैद्य यांनी व्यक्त केली. याठिकाणी रहेजा रुग्णालय आहे, त्यातील रुग्णांचे काय होत असेल, याचीही चिंता त्यांनी व्यक्त केली. भूखंड ताब्यात मिळेपर्यंत ३४ अटी पाळू म्हणून सांगितल्या जातात. परंतु भूखंड ताब्यात आला की विसरून जातात. त्यामुळे अटींचे पालन केले जात नाही, तोपर्यंत हा प्रस्ताव मंजूर करू नये, असे वैद्य यांनी सांगितले.

माहीम, दादरमधील दुकानदारांसह लोकांना मेट्रोमुळे त्रास होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडे लोकांच्या तक्रारी येत आहेत. मुलुंडला राहणाऱ्यांना दादरकरांच्या समस्या कळणार नाही, त्यामुळे हा प्रस्ताव परत पाठवण्याची मागणी माजी महापौर विशाखा राऊत यांनी केली. यावेळी काँग्रेसचे अश्रफ आझमी आणि जावेद जुनेजा यांनीही लोकांना विश्वास न घेता हा प्रकल्प राबवला जात असल्याबाबत नाराजी व्यक्त केली.

त्यावर उपायुक्त चंद्रशेखर चौरे यांनी हा प्रस्ताव मंजूर करावा, अशी विनंती केली. त्यानंतर सुधार समिती अध्यक्ष अनंत नर यांनी यामध्ये काही उद्यान व मोकळ्या जागांचा समावेश आहे. त्यामुळे पुन्हा हे प्लॅन सादर करण्यासाठी हा प्रस्ताव फेरविचारासाठी सादर करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी भाजपाच्या कोणाही सदस्यांनी त्याला विरोध दर्शवला नाही.


सरकारने मेट्रोसाठी मागणी केलेल्या मोकळ्या भूखंडांची यादी

  • महर्षी वाल्मिकी चौक (१२०३ चौ.मी)
  • महापालिका क्रीडा संकुल, आझाद मैदान (२५४ चौ.मी)
  • महापालिका इमारत, गिरगाव (१५० चौ.मी)
  • सिद्धिविनायक मंदिरामागची उद्यान विभागाची जागा (६७५४ चौ.मी)
  • देसाई मैदान, माहीम (२८६२ चौ.मी)
  • माहीममधील मोकळा रस्ता (५२०० चौ.मी)
  • शिवकिरण सोसायटी मोकळी जागा (३१६ चौ.मी)
  • किंग जॉर्ज पाचवा, मेमोरीयल वरळी येथील चौक (१७५६ चौ.मी)
  • वरळी, महापालिका चाळ (६८६ चौ.मी)
  • वरळी, आगारकर चौक शाळा (८२ चौ.मी)
  • जे. टाटा रोड, चर्चगेट (५३ चौ.मी)



हे देखील वाचा -

मुंबईत वृद्धाश्रमांची गरज वाढतेय, वृद्धाश्रमांकरीता २८ भूखंडाचे आरक्षण


 

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा