शिक्षकांचा सागाच्या लाकडी खुर्ची-टेबलांचा प्रस्ताव फेटाळला

  Mumbai
  शिक्षकांचा सागाच्या लाकडी खुर्ची-टेबलांचा प्रस्ताव फेटाळला
  मुंबई  -  

  मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना इको फ्रेण्डली बेंच आणि डेस्कचा पुरवठा करण्यात येत असतानाच शिक्षकांना मात्र सागाच्या लाकडाची खुर्ची आणि टेबलचा पुरवठा करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला. हा प्रस्ताव मंजूरकरण्याचा घाट शिवसेनेने घातला होता. परंतु पर्यावरणाच्या मुद्दयावरून या सागाच्या लाकडाच्या बेंच व टेबलची गरजच काय? असा सवाल करत भाजपाने हा प्रस्ताव फेटाळण्याची मागणी केली. याला विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिल्यामुळे बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव फेटाळण्याची नामुश्की सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षांवर आली. नव्या महापालिकेतील स्थायी समितीत विरोधकांच्या मदतीने भाजपाने मतदानाच्या जोरावर शिवसेनेला दिलेला हा पहिला दणका आहे.

  मुंबई महापालिकेच्या मराठी,हिंदी, इंग्रजीसह सर्व माध्ययमांच्या शाळांसाठी सागाच्या लाकडाच्या खुर्च्या व टेबल यांचा पुरवठा करण्यासाठी महापालिकेने निविदा मागवल्या होत्या. सागाच्या 2438 खुर्च्या आणि 1116 टेबल खरेदी करण्यात येणार आहे. या टेबल आणि खुर्च्या खरेदीसाठी संदीप टेक्सटाईल्स इंडस्ट्रीज या कंपनीची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना इको फेंण्डली बेंच व डेस्कचा पुरवठा करण्याचा निर्णय घेणाऱ्या महापालिकेने शिक्षकांसाठी खास सागाच्या लाकडाच्या टेबल आणि खुर्चीचा पुरवठा केला जाणार होता. 

  याबाबतचा प्रस्ताव मंजुरीला आला असता भाजपाचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांनी एका बाजूला मुलांना झाडे लावण्याचे आवाहन केले जाते आणि दुसरीकडे शिक्षकांसाठी टेबल आणि खुर्चीचा पुरवठा करण्यात येत आहे. हे पर्यावरणास घातक आहे. त्यामुळे याप्रस्तावात विसंगती असल्याचे त्यांनी सांगितले. यावर भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी पर्यावरणास घातक असल्यामुळे हा प्रस्ताव नामंजूर करण्यता यावा,अशी मागणी उपसूचनेद्वारे केली. काँग्रेसचे गटनेते रवी राजा यांनी पर्यावरणाचा विचार करता विद्यार्थ्यांसाठी जर इको फ्रेण्डली बेंच व डेस्क दिले जात आहे, तर मग शिक्षकांसाठीही इको फ्रेण्डली टेबल खुर्चीचा पुरवठा केला जावा,अशी मागणी त्यांनी केली. भाजपाचे विद्यार्थी सिंह यांनी यामध्ये लाकडाचा दर्जा तपासणे शक्य नसल्यामुळे यात भ्रष्टाचार होण्याची भीती व्यक्त केली. 

  शाळांसाठी टेबल खुर्ची आवश्यक असून, आपण घरी फर्निचर खरेदी करताना लाकडाचा का करतो,असा सवाल मंगेश सातमकर यांनी केला. सभागृहनेते यशवंत जाधव यांनी हा प्रस्ताव मंजूर होणे गरजेचे असून, प्रशासन सर्व बाबी पडताळूनच याची खरेदी करणार आहे. त्यामुळे आता हा प्रस्ताव मंजूर करून भविष्यात प्रशासनाने इको फ्रेण्डलीचा वापर करावा,अशी सूचना केली. त्यामुळे अखेर उपसूचना मताला टाकण्यात आली. यामध्ये भाजपासह काँग्रेस, सपा आणि राष्ट्रवादीच्या सर्व 14 सदस्यांनी हा प्रस्ताव नामंजूर करण्याच्या सूचनेच्या बाजूने मतदान केले. तर शिवसेनेच्या आठच सदस्यांनी मतदान केले. त्यामुळे नामंजूर करण्याच्या बाजूने बहुमत असल्यामुळे अखेर स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांना हा प्रस्ताव फेटाळावा लागला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.