Advertisement

पालिकेनेच घातले रहिवाशांना नाल्यात!


SHARES

महापालिकेच्या नालेसफाईचा ढोंगीपणा उघड करणारे हे बोलके दृष्य आहे मानखुर्दच्या साठे नगर येथील. कचऱ्याने तुंबलेला नाला, घाणेरडे पाणी आणि त्यातून वाट काढणारे रहिवासी पाहून तुमचे मन नक्कीच हेलावून जाईल. मात्र महिन्याभरापूर्वी इथे अशी परिस्थिती नव्हती. या नाल्यावर रहिवाशांनीच बांधलेले दोन लाकडी पूल होते. त्यावरून ते सहजपणे ये-जा करायचे. परंतु मान्सूनपूर्व नालेसफाईच्या नावाखाली महापालिकेने एक पूल हटविण्याचे आश्वासन देऊन दोन्ही पूल तोडून टाकले. एवढेच नव्हे, तर काम होताच, पर्यायी पूल उभारण्याऐवजी महापालिकेने येथून काढता पाय घेतला.

नाईलाजाने सध्या वृद्ध, महिला आणि शाळेत जाणाऱ्या चिमुरड्यांनाही या मोठ्या नाल्यातील घाण पाणी, चिखल तुडवत वाट काढावी लागत आहे. या नाल्याच्या दोन्ही बाजूला मोठी लोकवस्ती आहे. परंतु नाल्याच्या एका बाजूला राहणाऱ्या रहिवाशांना दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी मध्ये कुठलाही पादचारी पूल नाही. त्यामुळे मागच्या अनेक वर्षांपासून येथील रहिवासी स्थानिक नगरसेवक आणि महापालिकेकडे पक्क्या पादचारी पुलाची मागणी करत आहेत. परंतु महापालिका या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने रहिवाशांनी दोन वर्षांपूर्वी स्वत:च पुढाकार घेऊन नाल्यावर दोन लाकडी पूल बांधले.

अनेकदा मागणी करूनही महापालिका येथे पक्का पूल बांधत नसल्याने रहिवाशांना नाल्यातून मार्ग काढत घराकडे जावे लागत आहे. महापालिका अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक देखील येथे फिरकत देखील नसल्याने रहिवाशांमध्ये संतापाची भावना आहे. पालिकेच्या एम पूर्व विभागाचे सहायक आयुक्त श्रीनिवास किलजे आणि स्थानिक नगरसेवक विठ्ठल लोकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही.
- मोहम्मद सकीर, स्थानिक रहिवासी, मानखुर्द

या पुलावरून येणे-जाणे सुरू असताना अचानक महापालिकेने नालेसफाईच्या कामात अडथळा येत असल्याच्या नावाखाली हे दोन्ही पूल पाडले. परिणामी येथील रहिवाशांना पीएमजीपी वसाहत आणि मानखुर्द रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी मोठा वळसा घालून जावे लागत आहे. दोन मिनिटांच्या अंतरासाठी 15 मिनिटे जात असल्याने बहुतांश रहिवासी जीव धोक्यात घालून वृद्ध, महिलांसहित लहान शाळकरी मुलांना देखील याच नाल्यातून घेऊन जात आहेत. या नाल्यात पडून कुणाला गंभीर इजा झाली, तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न रहिवासी उपस्थित करत आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा