Advertisement

‘एसआरए’प्रतिनियुक्तीवर जाणाऱ्या पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दरवाजे बंद!


‘एसआरए’प्रतिनियुक्तीवर जाणाऱ्या पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दरवाजे बंद!
SHARES

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामध्ये (एसआरए) मुंबई महापालिकेकडून प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात येणारा कर्मचारी आणि अधिकारी वर्ग आता बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यापुढे एसआरएने आपल्याला लागणाऱ्या कर्मचाऱ्यांचं नियोजन करून स्वत:च याची व्यवस्था करावी, असे आदेशच महापालिका आयुक्तांनी एसआरए प्राधिकरणाला दिले आहेत.


पालिका आयुक्तांचे आदेश

मुंबईतील झोपडपट्टींचा विकास हा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत करण्यात येतो. या प्राधिकरणाची स्थापना केल्यानंतर याठिकाणी मुंबई महापालिका, म्हाडा, सहकार विभाग आणि जिल्हाधिकारी या कार्यालयांमधून कर्मचारी अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर पाठवलं जातं. यासर्व प्राधिकरणांमध्ये काही लिपिक वर्ग आणि शिपाई वर्ग हा कंत्राटी पद्धतीने घेतला जातो.

अभियंता आणि अधिकारी वर्ग हा महापालिकेसह इतर प्राधिकरण व मंडळांकडून प्रतिनियुक्तीवर पाठवला जातो. मात्र, याठिकाणी प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आलेले शिपाई हे अनेक वर्षांपासून एसआरएमध्ये ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे त्यातील ५ शिपायांना परत बोलावून घेतलं असून उर्वरीत शिपायांची मुदत संपल्यानंतर त्यांनाही परत पाठवण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत.


म्हणून हा निर्णय घेतला

एसआरएमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठवण्यासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून मोठा वशिला जातो. त्यामुळे याठिकाणी अभियंत्यांना पाठवण्यासाठी महापालिकेकडून परीक्षा घेण्यात आल्या आणि यामध्ये उत्तीर्ण झालेल्या अभियंत्यांनाच एसआरएत पाठवण्यात आलं होतं. महापालिकेतर्फे पाठवण्यात येणाऱ्या लिपिक व शिपाई वर्गांतील कर्मचाऱ्यांना चिठ्ठी काढून पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याला दुजोरा दिला असून ज्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी संपुष्ठात येईल, त्या जागी पुन्हा महापालिकेचा कर्मचारी पाठवण्यात येणार नाही. त्याठिकाण लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था एसआरएनेच करावी, असे मेहता यांनी स्पष्ट केलं.


महापालिकेलाही या कर्मचाऱ्यांची गरज

मुंबई महापालिकेत मोठ्याप्रमाणात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. अभियंत्यांचीही अनेक पदे रिक्त आहेत. ही रिक्तपदे भरली जात असली तरी प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात येत असल्याने याचं नियोजन करता येत नाही. महापालिकेलाही आता या कर्मचाऱ्यांची गरज आहे. एसआरए हे प्राधिकरण असल्याने सर्व कर्मचाऱ्यांना काही लवकर बोलावता येणार नाही. परंतु, जसजशी त्यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी संपुष्ठात येईल, तसतसं त्यांना महापालिकेत परत बोलावलं जाईल, असं मेहता यांनी स्पष्ट केलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा