Advertisement

…तर तुम्ही विरोधी पक्षनेतेपदी बसा! रवी राजांनी भाजपाला खडे बोल


…तर तुम्ही विरोधी पक्षनेतेपदी बसा! रवी राजांनी भाजपाला खडे बोल
SHARES

मागील महापालिका सभागृहात विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी भाजपा आमदार अमित साटम यांच्या शिवराळ भाषेचा समाचार घेत त्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे घायाळ झालेल्या भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी बुधवारी झालेल्या महापालिका सभागृहात संबंधित अधिकाऱ्याने दिलेलं लेखी पत्र दाखवून विरोधी पक्षनेत्यांच्या कामगिरीबाबत शंका उपस्थित करत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. याचा समाचार घेत रवी राजा यांनी विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची जबाबदारी चोख पार पाडत असून तुम्ही तुमचं बघा. विरोधी पक्षनेत्याची एवढीच चिंता असेल, तर या बसा आमच्या जागी, असे खडे बोल सुनावले.


जाहीर माफी मागा

बुधवारी पार पडलेल्या विशेष सभेत भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. महापालिका सभागृहात अनेक नगरसेवक आपली कामे बाजुला ठेवून उपस्थित राहत असतात. त्यामुळे महापालिकेचे सभागृह योग्यप्रकारे कसं चालावं, याचं नियोजन आणि काळजी ही सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेत्यांची असते. आजवर आम्ही अनेक विरोधी पक्षनेते पाहिले. त्यातील काही मोठेही झाले. परंतु मागील सभागृहाच्या बैठकीत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी एका आमदाराचे नाव न घेता त्यांनी अधिकाऱ्याला शिवराळ भाषा वापरल्याचं सांगत त्याची चौकशी करण्याची मागणी केली. त्यावेळी महापौर आपण या हरकतीच्या मुद्दयात तथ्य नसल्याचे सांगत तो निकाली काढला.


आरोप करताना भान राखा

परंतु आज आपल्या हाती या प्रकरणातील एक पत्र पडले आहे. या पत्रांमध्ये ज्या राठोड नावाच्या अधिकाऱ्याला धमकावल्याचं रवी राजा सांगत होते, त्याच अधिकाऱ्याने आपली अमित साटम यांच्या विरोधात कुठलीही तक्रार नसल्याचे लेखी पत्र दिलं आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी आरोप करताना सभागृहाचं भान राखून करावेत, असं त्यांनी सांगितलं.


हरकतीचा मुद्दा निकाली

मात्र, विरोधी पक्षनेत्यांनीही याचा चांगलाच समाचार घेतला. जे लिहून दिलंय ते दबाव टाकून लिहून दिलं आहे. तसेच ते पत्र त्यांनीच लिहिलं याचा पुरावा काय? असा सवाल करत रवी राजा यांनी या पत्रांची फॉरेन्सिक लॅबमार्फत तपासणी करण्यात यावी, अशी मागणी केली. या सभागृहात आम्हाला बोलायचा पूर्ण अधिकार आहे. पण भाजपाला चर्चा करायची नसते. विरोधी पक्षनेते आणि विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची जबाबदारी ओळखून काम करत असतो. भाजपाने आपले बघावं. तुम्ही तर लोकशाहीचा गळा घोटायला निघाला आहात, असा अरोप करत जर विरोधी पक्षाची एवढीच काळजी असेल तर त्यांनी विरोधी पक्षनेतेपदी बसा. आम्ही बसतो तिथे. करा मग कारभार असे बोल सुनावले. त्यावर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हा हरकतीचा मुद्दाच निकाली काढला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा