माहुलवासीयांना कुर्ल्यातील संक्रमण शिबिरांत हलवणार

कुर्ल्यातील संक्रमण शिबिरात रिकाम्या असलेल्या ५ हजार घरांपैकी काही घरं माहुलवासीयांसाठी तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याचं आश्वासन संजीवकुमार यांनी रहिवाशांना दिलं.

SHARE

माहुलमधील प्रदूषणाचा सामना करत संक्रमण शिबिरात राहणाऱ्या प्रकल्पग्रस्त रहिवाशांना राज्य सरकारने सोमवारी मोठा दिलासा दिला आहे. या संक्रमण शिबिरातील रहिवाशांची मागणी लक्षात घेऊन त्यांना लवकरच तात्पुरत्या स्वरूपात कुर्ला येथील संक्रमण शिबिरात स्थलांतरीत करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.


प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन

माहुलमधील प्रदूषण आणि अपुऱ्या सुविधांनी त्रस्त झालेल्या प्रकल्पग्रस्त रहिवाशांनी राज्य सरकारचं याप्रश्नी लक्ष वेधण्यासाठी रविवारी विद्याविहार येथील सिंधूवाडी ते कामा लेनपर्यंत मानवी साखळी उभारली. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर देखील सहभागी झाल्या होत्या. एवढंच नव्हे, तर आंदोलनकर्त्यांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या घाटकोपरमधील घरालाही घेराव घातला. त्यानंतर मेहता यांनी आंदोलकांसोबत चर्चा करण्याची तयारी दाखवली.


सचिवांचं आश्वासन

त्यानुसार मुख्यमंत्र्यांचे सचिव आणि नगरविकास विभागाचे सचिव संजीवकुमार यांच्यासोबत दुपारी आंदोलकांची बैठक झाली. या बैठकीत कुर्ल्यातील संक्रमण शिबिरात रिकाम्या असलेल्या ५ हजार घरांपैकी काही घरं माहुलवासीयांसाठी तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याचं आश्वासन संजीवकुमार यांनी रहिवाशांना दिलं. मुख्यमंत्र्यांशी बोलून यासंदर्भात ४ दिवसांत निर्णय घेतला जाईल, असंही ते म्हणाले.


प्रदूषण आणि अपुऱ्या सुविधा

मुंबईत महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. त्यामुळे संक्रमण शिबिराची कमतरता भासत असल्याने पुनर्विकासातील प्रकल्पग्रस्तांची रवानगी माहुल येथील प्रकल्पग्रस्त वसाहतीत केली जात आहे. बीआयटी चाळीसह महापालिकेच्या मालकीच्या अनेक इमारतींतील रहिवाशांना इथं स्थलांतरीत करण्यात आलं आहे. परंतु वसाहतींतील नागरी असुविधेमुळे प्रकल्पग्रस्त माहुलमध्ये राहण्यास तयार नाहीत.


रहिवासी त्रस्त

माहुल परिसरातील रिफायनरींचं प्रदूषण आणि वसाहतीत मूलभूत सुविधांची वानवा असल्याने इथं १०० हून अधिक रहिवाशांचे प्राण गेल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. त्यामुळे बहुसंख्य रहिवासी त्यांना इतरत्र स्थलांतरीत करण्याची मागणी महापालिका आणि राज्य सरकारकडे करत आहेत.


आंदोलन सुरूच

नगरविकास सचिवांनी कुर्ला इथं स्थलांतर करण्याचं आश्वासन दिलेलं असलं तरी, जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं म्हणत माहुलवासीयांनी विद्याविहार पाइपलाइनसमोर आंदोलन सुरू ठेवलं आहे.हेही वाचा-

३५ पे अँड पार्कसाठी पुन्हा निविदा

माहुलमधील सोयीसुविधांसाठी २९ कोटी खर्च नको!

माहुलऐवजी प्रकल्पबाधीत राहतोय भाड्याच्या घरात; शिवसेनेचा गौप्यस्फोटसंबंधित विषय
ताज्या बातम्या