Advertisement

अंधेरी, कुर्ला वॉर्डचे विभाजन करण्याचा प्रस्ताव

महापालिका प्रशासनानेच दोन प्रभागांच्या विभाजानाचा प्रस्ताव मांडला आहे.

अंधेरी, कुर्ला वॉर्डचे विभाजन करण्याचा प्रस्ताव
SHARES

अंधेरी आणि कुर्ल्याचे विभाजन करून दोन वॉर्ड तयार करण्याचा प्रस्ताव महापालिका गटनेत्यांच्या बैठकीत मांडण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या वॉर्डांची संख्या आता २४ वरून २६ वर होण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनानेच दोन प्रभागांच्या विभाजानाचा प्रस्ताव मांडला आहे.

अंधेरी पूर्व (के/पूर्व) आणि कुर्ला (एल) हे दोन्ही वॉर्ड अत्यंत मोठे आहेत. प्रशासकीय कामकाजासाठीही ते गैरसोयीचे असल्यानं या दोन्ही वॉर्डांचे विभाजन करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनानं ठेवला आहे.

छोटे वॉर्ड असल्यास प्रशासकीय सोयीसाठी आणि जनतेच्या कामासाठी त्याचा अधिक उपयोग होऊ शकतो. त्यामुळेच या दोन्ही वॉर्डच्या विभाजनाचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

दरम्यान, या दोन वॉर्डाचे विभाजन करण्यासाठी महापालिकेनं आधी समिती नेमली होती. महापालिकेचे सहआयुक्त सुनील धामणे आणि भारत मराठे यांच्या समितीनं अभ्यास करून अहवाल सादर केला होता.

वॉर्डातील लोकसंख्या, सुविधा, प्रशासनावर येणारा ताण, नागरिकांची होणारी गैरसोय आदी मुद्द्यांचा या समितीनं अभ्यास करून के पूर्व आणि ‘एल’ विभागाचे विभाजन करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर हा प्रस्ताव गटनेत्यांच्या सभेत आला आहे.

एल वॉर्ड हा मोठ्या वॉर्डपैकी एक समजला जातो. या वॉर्डात एकूण १६ नगरसेवक येतात. या वॉर्डात सुमारे ९ लाख लोक राहतात. त्यामुळे एल दक्षिण आणि एल उत्तर असे दोन वॉर्ड करण्यात येणार आहेत.

एका वॉर्डाची इमारत कुर्ला (पश्चिम) डेपोजवळ आहे तिथेच राहील. तर नव्या वॉर्डाची इमारत चांदिवली इथं करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे चांदिवली आणि परिसरातील नागरिकांना प्रशासकीय कामासाठी कुर्ल्यात येण्याची गरज पडणार नाही.

या शिवाय के पूर्व या विभागाचे के दक्षिण व के उत्तर असे दोन भाग करण्याचा प्रस्ताव आहे. के पूर्वमध्ये १५ नगरसेवक येतात. के पूर्वमध्ये ८ लाख २३ हजार लोक राहतात. तर, पी उत्तर (मालाड ) या वॉर्डाचे मालाड पूर्वेला पी पूर्व तर मालाड पश्चिम म्हणजे पी पश्चिम असे दोन वॉर्ड करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

गटनेत्यांच्या बैठकीत वॉर्डाच्या विभाजनावर चर्चा होऊन त्यावर शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर हा प्रस्ताव महापालिका महासभेत मांडला जाईल. तिथं मंजुरी मिळाल्यानंतर दोन वॉर्डांची विभागणी केली जाऊन नवे वॉर्ड अस्तित्वात येतील.



हेही वाचा

महापालिका 'या' उद्यानात उभारणार 'ट्री हाऊस'

मुंबई महापालिकेचा 'या' विद्यार्थ्यांसाठी ३९ कोटींचे टॅब खरेदीचा निर्णय

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा