Advertisement

आधीच घागर उताणी, त्यात महापालिका बांधणार ४ नवे स्विमिंग पूल

मुंबई महापालिका ४ नवीन स्विमिंग पूल बांधत आहेत. या चारही स्विमिंग पूलच्या बांधकामांसाठी स्वतंत्र कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. या चारही स्विमिंग पूलसाठी सरासरी ९ कोटी रुपयांप्रमाणे ३६ कोटी रुपये खर्च केले जात आहेत.

आधीच घागर उताणी, त्यात महापालिका बांधणार ४ नवे स्विमिंग पूल
SHARES

मुंबई महापालिकेच्या स्विमिंग पूलच्या देखभालीचा प्रश्न जटील होत असतानाच महापालिका आणखी ४ स्विमिंग पूल बांधायला निघाली आहे. अंधेरी पूर्व व पश्चिम तसेच गोवंडी आणि दहिसर पश्चिम आदी ४ भागांमध्ये महापालिका नवीन स्विमिंग पूल बांधत आहे.


सध्या स्विमिंग पूल कुठे?

मुंबईत सध्या ७ स्विमिंग पूल आहेत. यामध्ये दादर परिसरात महात्मा गांधी स्मारक ऑलिंम्पिक स्विमिंग पूल, घाटकोपरमध्ये महापालिका स्विमिंग पूल, चेंबूर मधील जनरल अरुणकुमार वैद्य स्विमिंग पूल, कांदिवलीत सरदार वल्लभभाई पटेल स्विमिंग पूल, दहिसरमध्ये श्री मूरबाळीदेवी स्विमिंग पूल यांचा समावेश आहे. यापैकी चेंबूर व कांदिवलीतील स्विमिंग पूलचं सध्या नूतनीकरण सुरु आहे.


आणखी ४ स्विमिंग पूलची भर

त्याचबरोबर मुलुंडमधील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल आणि अंधेरीतील शहाजीराजे क्रीडा संकुल येथे महापालिकेचे प्रत्येकी १ याप्रमाणे २ स्विमिंग पूल आहेत. या दोन्ही स्विमिंग पूलची देखभाल व व्यवस्थापन ‘बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठान’ यांच्यामार्फत केली जाते. मात्र, या सर्व स्विमिंग पूलमध्ये आणखी ४ स्विमिंग पूलची भर पडणार आहे. या चारही स्विमिंग पूलच्या बांधकामांसाठी स्वतंत्र कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. या चारही स्विमिंग पूलसाठी सरासरी ९ कोटी रुपयांप्रमाणे ३६ कोटी रुपये खर्च केले जात आहेत.


स्विमिंग पूलची कामे अशी होणार

आर. सी. सी स्विमिंग पूल, प्रशासकीय इमारत, व्यायामशाळा, सुरक्षा भिंत, जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याची टाकी, यांत्रिकी व विद्युत कामे आदी कामे तसेच आग प्रतिबंधक साधने बसवणे, याशिवाय गवत लावणे, शोभिवंत रोपे लावणे, झाडे लावणे आदी प्रकारची कामे केली जाणार आहेत.


आयुक्तांनीही सुचवले ७ स्विमिंग पूल

मुंबईकरांना जलतरणाच्या सोयी सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने प्रत्येक परिमंडळामध्ये एक नवीन स्विमिंग पूल बांधण्याबाबत जागा निश्चित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी परिमंडळीय मासिक बैठकीत दिले होते. या जागा निश्चित करताना ज्या विभागात आधीपासून महापालिकेचे स्विमिंग पूल आहेत, ते विभाग वगळून जागा निश्चित करावी, असेही आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. यानुसार ७ परिमंडळांमध्ये जागा निश्चित करुन प्राथमिक प्रस्तावही तयार करण्यात आले होते. त्यामुळे विद्यमान स्विमिंग पूलव्यतिरिक्त ४ नवीन स्विमिंग पूल आणि आयुक्तांच्या आदेशानुसार आणखी ७ अशाप्रकारे जलतरण तलावांची संख्या भविष्यात वाढण्याची शक्यता आहे.


प्रस्ताव फेटाळण्याची शक्यता

महापालिकेने हाती घेतलेल्या ४ जलतरण तलावांपैकी दहिसर पश्चिम येथील ज्ञानधारा मैदान येथील तलाव बांधण्याचं कंत्राट लँडमार्क कार्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने मिळवलं आहे. परंतु याच लँडमार्क कंपनीने चुकीचे माहिती देत कंत्राटे मिळवल्याचा ठपका ठेवत स्थायी समितीने मागील सभेत रस्त्यांचे २ प्रस्ताव फेटाळत प्रशासनाकडे परत पाठवून दिले होते. त्यामुळे या ४ कंत्राटदारांपैकी एक कंत्राटदार हा लँडमार्क असल्यामुळे आता सत्ताधार पक्ष आणि कशाप्रकारे मंजूर करतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र, दहिसरचे काम वगळून उर्वरीत कामे मंजूर करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्यामुळे एकट्या लँडमार्क कंपनीमुळे हा संपूर्ण प्रस्तावच सत्ताधारी पक्षाला फेटाळून लावावा लागणार आहे.


स्विमिंग पूल

अंधेरी पश्चिम: इंदिरा गांधी मनोरंजन मैदान (९.२१ कोटी रुपये)
अंधेरी पूर्व: कोंडीविटा गाव (९.१८ कोटी रुपये)
दहिसर पश्चिम: ज्ञानधारा मैदान (९.१६ कोटी रुपये)
गोवंडी पूर्व: रमाबाई आंबेडकर उद्यान (९.२७ कोटी रुपये)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा