
मुंबईतील घटत चाललेले हरित क्षेत्र आणि वाढत्या उष्णतेच्या लाटांच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या Brihanmumbai Municipal Corporation ट्री अथॉरिटी बैठकीत भाजपचे गटनेते गणेश खंकार (Ganesh Khankar) यांनी महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडला आहे.
मुंबईतील प्रत्येक गृहनिर्माण संस्थेने एक झाड लावल्यास, वर्सोवा-भाईंदर लिंक रोड (Versova Bhayandar Link Road) प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या सुमारे 45 हजार झाडे आणि मॅंग्रोव्हच्या नुकसानीची भरपाई होऊ शकते, असे त्यांनी म्हटले.
खंकार यांनी सांगितले की, या प्रस्तावाला समिती सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून मुंबईकरांना सोसायटी परिसरात वृक्षलागवड करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. यामुळे शहरातील हरित क्षेत्र वाढण्यास आणि उष्णतेचा प्रभाव कमी करण्यास मदत होईल.
दरम्यान, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनीही आरेतील 65 एकर जागेवर वृक्षलागवडीचा आराखडा तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. हा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या 2031 पर्यंत 300 कोटी झाडे लावण्याच्या राज्यव्यापी मोहिमेचा भाग आहे.
मात्र, पर्यावरणतज्ज्ञांनी केवळ झाडांची संख्या वाढवणे पुरेसे नसून योग्य ठिकाणी आणि योग्य प्रजातींची लागवड होणे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले आहे. University of Melbourne च्या ‘Nature in Cities, Nurturing Cities’ या अभ्यासानुसार, शहरातील हरितीकरणाचे परिणाम स्थानिक हवामान, रस्त्यांची रचना, वनस्पतींची मांडणी आणि झाडांच्या प्रकारांवर अवलंबून असतात.
स्टॅलिन डी यांनी सांगितले की, “एका झाडामुळे उष्णतेत फारसा फरक पडत नाही. सावली देणाऱ्या झाडांचा समूह तापमान कमी करण्यात आणि हवेचा प्रवाह सुधारण्यात प्रभावी ठरतो.” त्यांनी मुंबईतील वाढत्या काँक्रीटीकरणावरही टीका करत जंगल आणि मोठ्या हरित पट्ट्यांची गरज अधोरेखित केली.
Bombay Environmental Action Group चे प्रकल्प कार्यकारी अनिल पंडित (Anil Pandit) यांनीही केवळ झाडे लावण्याऐवजी नियोजनबद्ध शहरी जंगल उभारण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली. “यशाचे मोजमाप फक्त किती रोपे लावली यावर नव्हे, तर त्या झाडांमुळे तापमान कमी होते का, हवा सुधारते का आणि शहर हवामान बदलास अधिक सक्षम बनते का यावर व्हायला हवे,” असे त्यांनी सांगितले.
माजी राज्य आरोग्य निरीक्षण अधिकारी डॉ. प्रदिप आवटे (Dr Pradip Awate) यांनीही हवामान बदलाच्या दुष्परिणामांवर नियंत्रणासाठी वृक्ष महत्त्वाचे असल्याचे सांगितले. मात्र चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या प्रजातींची लागवड केल्यास वृक्षारोपणाचा उद्देशच फेल ठरू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा
