SHARE

मुंबई - महानगरपालिकेच्या सफाई कामगारांसाठी आर्थररोड तुरुंगाजवळ बांधण्यात येणाऱ्या तात्पुरत्या संक्रमण शिबिराला तुरुंग प्रशासनाने अद्याप ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. असे असतानाही या संक्रमण शिबिराच्या बांधकामासाठी कंत्राटदार नियुक्त करण्याची घाई पालिका प्रशासनाला झाली आहे.

बांधकामासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया पालिकेने पूर्ण केली असून, या कंत्राटदाराच्या नियुक्तीला मंजुरी देण्यासाठीचा प्रस्ताव गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडला आहे. मात्र ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नसतानाही संक्रमण शिबिराच्या कंत्राटदाराची नियुक्ती करण्याची घाई का, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कामगारांसाठी 60 खोल्यांचे पाच मजली तात्पुरते संक्रमण शिबीर आर्थर रोड तुरूंगाजवळ बांधण्यात येणार आहे. यासाठी 3 कोटी 60 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
मात्र हे संक्रमण शिबीर आर्थर रोड तुरुंग परिसरात असल्याने तुरुंग प्रशासनाची परवानागी घेणे आवश्यक आहे. त्यासाठीचा प्रस्ताव पालिकेने तुरूंग प्रशासनाला पाठवला आहे. मात्र तुरूंग प्रशासनाकडून या प्रस्तावाला अद्याप हिरवा कंदिल मिळालेला नाही.तरीही पालिकेने कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर कंत्राटदाराची नियुक्ती करून त्यासंंबंधीचा प्रस्ताव स्थायी समितीत मांडणे आवश्यक असते. मात्र सर्व नियम धाब्यावर बसवत पालिकेला कंत्राटदार नेमण्याची इतकी घाई का असा सवाल करत नगरसेवकांनी याबाबत संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे गुरुवारी स्थायी समितीत या मुद्दयावरून गोंधळ होण्याची शक्यता आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या