मुंबईत ‘पेट गार्डन’ साकारायला महापालिकेचा नकार

 BMC
मुंबईत ‘पेट गार्डन’ साकारायला महापालिकेचा नकार
BMC, Mumbai  -  

मुंबईतील अनेक उद्यान आणि मैदानांचा विकास महापालिकेच्या वतीने केला जात असला तरी अनेक उद्यानांमध्ये फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आपल्यासोबत आणलेल्या पाळीव प्राण्यांना बाहेरच फिरवावे लागते. त्यामुळे मनुष्याप्रमाणे पाळीव प्राण्यांनाही त्यांचे हक्काचे गार्डन मिळावे, म्हणून मागील अनेक वर्षांपासून नगरसेवकांकडून मागणी होत आहे. मात्र मुंबईत ‘पेट गार्डन’ उभारायला महापालिका प्रशासनाने चक्क नकार दिला आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार लोकांना पुरेशी मैदाने आणि उद्याने उपलब्ध नसल्यामुळे प्राण्यांसाठी उद्यान उभारता येणार नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

मुंबईमध्ये नागरिकांच्या मनोरंजनासाठी तसेच विरंगुळ्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात कमी मोकळ्या जागा उपलब्ध आहेत. नागरिकांसाठी उद्याने, मनोरंजन मैदाने विकसित करण्यात येत असली, तरी लोकसंख्येच्या प्रमाणात नागरिकांच्या सोयीसाठीचे मोकळे भूखंड कमी असल्यामुळे पाळीव पशुपक्ष्यांना फिरण्यासाठी ‘पेट गार्डन’ची सुविधा प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत उपलब्ध करुन देणे शक्य नसल्याचे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केले आहे.


हेही वाचा - 

आता भटक्या कुत्र्यांचा त्रास कमी होईल?

मंत्र्यांच्या भेटीला कुत्रे


मुंबईतील अनेक नागरिक हौसेखातर किंवा आवश्यकतेनुसार आपल्या घरी कुत्रा, मांजर, विविध जातींचे पक्षी आदी पाळीव पशुपक्षी पाळत असतात. या पशुपक्ष्यांची महापालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये नोंद केली जाते. पाळीव प्राण्यांसाठी वैद्यकीय सुश्रुषेसाठी मुंबईत विविध ठिकाणी उपचार केंद्रेही आहेत. मात्र पाळीव प्राण्यांमधील, विशेषत: कुत्र्यांना फिरवताना रस्त्यावरील भटकी कुत्री त्यांच्या मागे लागतात. त्यामुळे पाळीव कुत्र्याला रस्त्यावर फिरवणेही जिकरीचे होते. त्यामुळे ‘पेट गार्डन’ची सुविधा उपलब्ध असल्यास नागरिकांना पाळीव पशुपक्ष्यांना पेट गार्डनमध्ये नेता येईल, असे मत काँग्रेसचे माजी नगरेसवक परमिंदर भामरा यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे नोंदवले होते.

काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुषमा साळुंखे यांनीही अशाच प्रकारे मागणी करत शहरातील पाळीव प्राणी आणि तमाम प्राणीप्रेमींसाठी आवश्यक त्या विविध सुविधांनी सुसज्ज अशी स्वतंत्र उद्याने उभारण्याची सूचना केली होती. शहरातील, विशेषत: कुलाबा, मरीन ड्राईव्ह या भागात पाळीव प्राण्यांसाठी वेगळे असे एकही उद्यान नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Loading Comments