Advertisement

घनकचरा खात्याला 'सरदार'ची गरज


घनकचरा खात्याला 'सरदार'ची गरज
SHARES

घनकचरा खात्याच्या प्रचलन विभागाचे उपप्रमुख अभियंता सुनील सरदार यांची मुंबई महापालिकेच्या सी विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदासाठी नियुक्ती झाली. मात्र दहा दिवस पालटले तरी अद्यापही त्यांची मूळ जागेवरून सुटका केली जात नाही. सरदार यांच्यासारख्या अनुभवी अधिकाऱ्याची घनकचरा खात्याला गरज असल्याचे कारण देत त्यांना पदमुक्त करण्यास घनकचरा खात्यानं नकार दर्शवला आहे. महापालिका आयुक्तांच्या मान्यतेनेच सरदार यांची नियुक्ती सी विभागाच्या सहायक आयुक्तपदी झाली आहे. परंतु त्यांना पदमुक्त न करता, एकप्रकारे सरदार यांना घनकचरा खात्यातच ठेवण्याचं साकडं आयुक्तांना घातलं जात आहे.


नियुक्तीचे अादेश १० दिवसांपूर्वी

महापालिकेच्या बी विभागाच्या सहायक आयुक्तपदी विवेक राही आणि सी विभागाच्या सहायक आयुक्तपदासाठी सुनील सरदार यांच्या नियुक्तीचे आदेश मागील १३ जुलै २०१८ला महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी काढले. मात्र दहा दिवस उलटत आले तरी सुनील सरदार यांनी सी विभागाच्या सहायक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारलेला नाही.


सात जणांमधून सरदार यांची निवड

बी विभागाचे सहायक आयुक्त उदयकुमार शिरुरकर हे सेवानिवृत्त झाल्यामुळे तर सी विभागाचे सहायक आयुक्त जीवक घेगडमल हे निलंबित झाल्यामुळे या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या. मागील काही महिन्यांपासून सी विभागाला सहायक आयुक्त नाही. बऱ्याच कालावधीनंतर लोकसेवा आयोगाच्या वतीनं सहायक आयुक्तपदासाठी सात उत्तीर्ण उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर यापैकी सरदार यांची वर्णी लागली होती.


स्वच्छ भारत अभियानात महत्त्वाचं योगदान

सुनील सरदार हे घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रचलन विभागाचा कारभार सांभाळत असून याच विभागानं 'स्वच्छ भारत अभियाना'त महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. यामध्ये सरदार यांचं योगदान मोठं आहे. विशेष म्हणजे याच महिन्यांमध्ये घनकचरा विभागातील दोन वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यातच सरदार यांनाही पदमुक्त केल्यास या खात्यात मोठी पोकळी निर्माण होईल. सरदार यांच्या अनुभवाची या खात्याला गरज असल्यामुळे किंबहुना ते या खात्यासाठी महत्त्वाचे अधिकारी असल्यामुळे त्यांना पदमुक्त करता येणार नाही, असं पत्र उपायुक्त (घनकचरा) यांनी आयुक्तांना पाठवलं आहे. त्यामुळे आयुक्त आपला निर्णय बदलतात की कायम ठेवतात, याकडे खात्यांचं लक्ष लागलं आहे.


हेही वाचा -

आता ऑनलाईन तिकीट महाग!

सायकल ट्रॅकच्या कंत्राटात घपला, २१ कोटींचं नुकसानसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा