वांद्रे रेल्वे स्थानकाचा रस्ता होणार मोकळा


  • वांद्रे रेल्वे स्थानकाचा रस्ता होणार मोकळा
SHARE

मुंबई महापालिकेने वांद्रे पश्चिमेकडील रेल्वे स्थानक परिसरात सुशोभीकरणाचं काम हाती घेतलं आहे. या कामादरम्यान स्थानकाला लागून असलेल्या रस्त्याचं रुंदीकरणही करण्यात येणार आहे. त्यानुसार रेल्वेच्या जागेवरील बांधकामे हटवताना पुनर्बांधणीचा खर्च म्हणून महापालिकेला रेल्वे प्राधिकरणाला २.२५ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. याकडे पाहता रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यात भर घालताना महापालिका रेल्वेला आर्थिक सक्षम बनवण्याचं कामही करत असल्याचं चित्र दिसून येत आहे.


अनधिकृत बांधकामांवर कारवाई

वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला लागून असलेल्या रस्त्याचं रुंदीकरण आणि सुशोभीकरण करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. स्थानकाबाहेरील हा रस्ता अरुंद असून त्यामुळे पादचारी आणि वाहनांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हा स्थानक मार्ग असल्याने तो अतिशय वर्दळीचा आणि महत्त्वाचा आहे. त्यामुळे स्थानकाबाहेरील अनधिकृत बांधकामे आणि दुकानांवर कारवाई करून हा रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यात येणार आहे.पुनर्बांधणीचा खर्च

या रस्ता रुंदीकरणात रेल्वेची देखील काही बांधकामे येत आहेत. ही बांधकामे तोडून ही जागा महापालिकेला उपलब्ध करून देण्याचं पश्चिम रेल्वेने मान्य केलं आहे. त्यानुसार ही बांधकामे तोडण्यात येणार आहे. रेल्वे प्रवासी आणि वाहतुकीसाठी रेल्वेने आपली जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली असली, तरी या बांधकामांच्या पुनर्बांधणीचा खर्च महापालिकेला द्यावा लागणार आहे.

त्यानुसार महापालिकेला रेल्वे प्रशासनाला २.२५ कोटी रुपये द्यायचे आहे. या अटीवरच रेल्वे प्रशासन या कामास तयार झाली आहे. रेल्वेसोबत झालेल्या करारपत्राप्रमाणे पुनर्बांधणीची रक्कम रेल्वेला द्यावी लागेल, असं महापालिकेच्या एच/पश्चिम विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या