Advertisement

रद्द जम्मू-काश्मीर दौऱ्याप्रकरणी स्वीय सहायकावर ठपका

अध्यक्षांच्या सूचनेनुसार ऐनवेळी रद्द करण्यात आलेल्या जम्मी-काश्मीर या अभ्यास दौऱ्यासाठी ट्रॅव्हल कंपनीला सुमारे साडेसात लाख रुपये देण्यात आले होते. परंतु हा दौरा रद्द झाल्यावर भरलेले पैसे देण्यास ट्रॅव्हल कंपनीनं नकार दिला.

रद्द जम्मू-काश्मीर दौऱ्याप्रकरणी स्वीय सहायकावर ठपका
SHARES

अंदाजे २ वर्षांपूर्वी महापालिकेच्या बाजार व उद्यान समितीचा जम्मू आणि काश्मीर अभ्यास दौरा रद्द करण्यात आला होता. अध्यक्षांच्या सूचनेनुसार ऐनवेळी रद्द करण्यात आलेल्या या अभ्यास दौऱ्यासाठी ट्रॅव्हल कंपनीला सुमारे साडेसात लाख रुपये देण्यात आले होते. परंतु हा दौरा रद्द झाल्यावर भरलेले पैसे देण्यास ट्रॅव्हल कंपनीनं नकार दिला. त्यामुळे महापालिकेच्या झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत तत्कालीन अध्यक्ष अजित भंडारी यांना सोडून इतर कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचं फर्मान आयुक्तांनी सोडलं आहे.


कधी आयोजित केला होता दौरा?

जम्मू आणि काश्मीरमधील बाजार व उद्यानांच्या विकासाचा अभ्यास करण्यासाठी महापालिकेच्या बाजार व उद्यान समितीच्या सर्व सदस्यांच्या श्रीनगर इथं २ ते ६ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत अभ्यास दौरा आयोजित केला होता. समितीचे तत्कालिन अध्यक्ष अजित भंडारी यांच्यासह सदस्य आणि अधिकारी असे १७ जण या अभ्यास दौऱ्यावर जाणार होते. त्यामुळे विमानप्रवासासह वास्तव्य, नाश्ता, जेवण आदींकरता आयुक्तांच्या स्वेच्छा अधिकारातील खर्चातील निधीचा वापर करण्यात आला होता. यासाठी येणाऱ्या खर्चासाठी १३ लाख रुपये भंडारी यांचे तत्कालिन स्वीय सहायक प्रद्युम्न केणी यांच्याकडे ३० जानेवारी २०१६ला जमा करण्यात आले होते.


कुणाकडे केलं होतं बुकींग?

त्यामुळे या दौऱ्यासाठी विमान प्रवासाकरता राजशिष्टाचार खात्यामार्फत निश्चित करण्यात आलेल्या 'मेसर्स बालमेर व लौरी ट्रॅव्हल अँड व्हेकेशन' कंपनीला १ फेबुवारी २०१६ ला ७ लाख ६२ हजार ३६७ रुपये एवढी रक्कम देण्यात आली. परंतु समिती अध्यक्ष भंडारी यांनी २ फेब्रुवारीला हा दौरा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती महापौरांसह, आयुक्तांना दिली. त्यानुसार दौरा रद्द करण्याच्या सूचना स्वीय सहायक केणी यांनी राजशिष्टाचार व संपर्क अधिकाऱ्यांना दिली.


पैसे देण्यास नकार

परंतु या कार्यालयाने संबंधित कंपनीशी संपर्क न केल्यामुळे केणी यांनी स्वत: याबाबत पाठपुरावा केला. परंतु दौरा रद्द झाल्यामुळे दिलेले पैसे परत मिळावे म्हणून संबंधित कंपनीशी पत्रव्यवहार केला असता त्यांनी हे पैसे परत देण्यास नकार दिला. त्यामुळे हा दौरा रद्द झाल्यामुळे महापालिकेच्या साडेसात लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे या दौऱ्याचं आरक्षण करणाऱ्या केणी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांनी दिले आहेत. त्यानुसार या दौऱ्याच्या नुकसानाबाबत प्राथमिक चौकशी करण्यात येणार आहे.


जबाबदार कोण?

या दौऱ्यासाठी १७ जणांचं बुकींग झालं होतं. स्थायी समितीचे सदस्य अभ्यासदौऱ्यावर गेल्यानंतर जी काही टीका होत होती, त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा दौरा रद्द करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे दौऱ्याच्या दिवशीच तो रद्द करण्यात आला. शेवटच्या क्षणी प्रवास रद्द केल्यास त्याचे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे ज्यांनी हा दौरा रद्द केला त्या अध्यक्षांकडून हे पैसे वसूल करण्याऐवजी प्रशासनाच्या अधिकाऱ्याला दोषी ठरवून त्यांची चौकशी करून त्यांना मानसिक त्रास देण्याच्या या प्रकारामुळे विभागातून संताप व्यक्त होत आहे.



हेही वाचा-

सायकल ट्रॅकच्या कंत्राटात घपला, २१ कोटींचं नुकसान

मुंबईतील प्राण्यांच्या यातनांना ‘टाटा’



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा