भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे रस्त्यांचे प्रस्ताव फेटाळले

 Pali Hill
भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे रस्त्यांचे प्रस्ताव फेटाळले

मुंबई - आचारसंहितेमुळे सर्वच विकास कामांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जात आहे. मात्र कंत्राटदारांना मदत करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने प्रस्ताव आणून ते मंजूर करून घेण्याचा प्रशासनाचा डाव स्थायी समितीत उधळून लावला. रस्ते कंत्राट कामातच अधिक भ्रष्टाचार असल्याचा आरोप सर्वच सदस्यांनी केल्यामुळे अखेर रस्ते विकास कामांचे तब्बल सात प्रस्ताव रेकॉर्ड केले.

स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत एकूण 112 विकास कामांचे प्रस्ताव आले होते. त्यात पश्चिम उपनगरातील परिमंडळ 3, 4, 7 आणि पूर्व उपनगरातील परिमंडळ 5 आणि 6 मधील पावसाळ्यापूर्वी खड्डे दुरुस्ती, पूर्व-पश्चिम उपनागरातील सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे सांधे बदलणे आदी प्रस्ताव रेकॉर्ड करण्यात आले. प्रशासनाने सिमेंट काँक्रिट रस्त्यांवरील सांधे भरण्याचे प्रस्ताव आणले असले तरी त्यातील अर्धे रस्ते हे डांबरी आहेत. त्यावर सांधे कसे भरणार असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने प्रस्ताव आणून कंत्राटदाराला मदत करण्याचे काम अधिकारी करत आहेत. त्यामुळे यात मोठा भ्रष्टाचार असल्यानं हे प्रस्ताव मंजूर करू नये अशी मागणी सर्वच सदस्यांनी केली.

रस्ते कामांबाबत सदस्यांनी केलेल्या मागणीनुसार प्रस्ताव रेकॉर्ड केले असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनी सांगितले. ज्या विकासकामांबाबत सदस्यांच्या मनात शंका आहेत आणि त्यांच्या शंकांचे निरसन प्रशासनाने न केल्यामुळे ते प्रस्ताव परत पाठवून लावले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Loading Comments