Advertisement

बायोमेट्रीक हजेरी लावून व्हायचे पसार; पालिकेचे १४ कर्मचारी निलंबित

कर्मचारी बायोमेट्रीक हजेरी लावून असेच पसार होत असल्याचं समोर आलं. यासंबंधीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांना दिली नि त्यांनी तात्काळ निलंबित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय देत या १४ सफाई कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे.

बायोमेट्रीक हजेरी लावून व्हायचे पसार; पालिकेचे १४ कर्मचारी निलंबित
SHARES

मुंबई महानगर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून ए विभागातील फोर्ट, कुलाबा, कफ परेड आदी परिसरात पालिकेकडून दैनंदिन साफसफाई केली जायची. पण ही साफसफाई योग्य प्रकारे होत नसल्याच्या तक्रारी आल्यानं शुक्रवारी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक कामाची तपासणी करण्यासाठी या परिसरात धाड टाकली नि एक धक्कादायक बाब समोर आली. 

या परिसरातील १४ सफाई कर्मचारी बायोमेट्रीक हजेरी लावून पसार होत असल्याचं निदर्शनास आलं. कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि पालिकेला चुना लावणाऱ्या या १४ कर्मचाऱ्यांना पालिकेकडून तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे. पालिकेकडून करण्यात आलेली ही कारवाई बायोमेट्रीकच्या नावाने पालिकेला चुना लावणाऱ्यांसाठी दणका मानला जात अाहे. यामुळं आता अशा प्रकारांना चाप बसेल असंही म्हटलं जात आहे. 


नागरिकांकडून तक्रारी

पालिकेकडून बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. सफाई कर्मचाऱ्यांसाठीही बायोमेट्रीक लागू आहे. त्यानुसार पालिकेच्या ए विभागातील सफाई कर्मचारी दररोज वेळेत कामावर हजर रहायचे आणि काम संपवून घरी निघायचे. असं असतानाही एल विभागातील नागरिकांकडून सफाई योग्य होत नसल्याबद्दलच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येण्यास सुरूवात झाली होती. या तक्रारींची दखल घेत वरिष्ठांनी शुक्रवारी सकाळी मरिन ड्राईव्ह परिसरात कामाची तपासणी करण्यासाठी धाव घेतली. पण कामाच्या ठिकाणी १४ कर्मचारी प्रत्यक्षात हजर नसल्याचं दिसून आलं. मात्र, या कर्मचाऱ्यांची बायोमेट्रीक हजेरी मात्र लागली होती.


कारणे दाखवा नोटीसा 

याची संपूर्ण तपासणी केली असता हे कर्मचारी बायोमेट्रीक हजेरी लावून असेच पसार होत असल्याचं समोर आलं. यासंबंधीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांना दिली नि त्यांनी तात्काळ निलंबित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय देत या १४ सफाई कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये एक मुकादम असून १३ कामगार आहेत. त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे या कर्मचाऱ्यांशी संबंधीत २ पर्यवेक्षक आणि एका सहाय्यक मुख्य पर्यवेक्षकासही कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.


सहाय्यक आयुक्तांना अादेश

बायोमेट्रीक हजेरी लावून कर्मचारी पसार होत असल्याचं समोर आल्यानं आता पालिकेनं याला चाप बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अतिरिक्त पालिका आयुक्त विजय सिंघल यांनी सर्वच्या सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना आपापल्या कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कामांची दररोज तपासणी करावी असे आदेश दिले आहेत. तर कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात तात्काळ निलंबनाची कारवाई करावी असेही आदेश सिंघल यांनी दिले आहेत. त्यामुळं बायोेमेट्रीकच्या नावे चुना लावणं आता पालिका कर्मचाऱ्यांना चांगलचं महागात पडू शकतं.



हेही वाचा - 

बेकायदा बांधकामांना सरसकट संरक्षण नाहीच, उच्च न्यायालयाचा सरकारला दणका

अमेरिकी नागरिकांना गंडवणारे ८ जण जेरबंद; प्रतिबंधक औषधांची आॅनलाईन विक्री




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा