फॅशन स्ट्रीटवरील 49 फेरीवाल्यांचे परवाने रद्द

Bandra west
फॅशन स्ट्रीटवरील 49 फेरीवाल्यांचे परवाने रद्द
फॅशन स्ट्रीटवरील 49 फेरीवाल्यांचे परवाने रद्द
See all
मुंबई  -  

तरुणाईला भुरळ पाडणाऱ्या आकर्षक कपड्यांचा बाजार असलेल्या फॅशन स्ट्रीटवरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या परवानाधारक फेरीवाल्यांना महापालिकेने चांगलाच धडा शिकवला आहे. परवाना असल्यामुळे अतिक्रमण करून तसेच दुसऱ्यांना जागा भाड्याने देऊन धंदा करणाऱ्या 49 फेरीवाल्यांचे परवाने रद्द करण्याची धाडसी कारवाई महापालिकेने केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचे परवाने रद्द करण्याची ही मुंबईतील पहिलीच घटना आहे.

मुंबईतील फेरीवाल्यांना परवाने देण्याची मागणी होत असतानाच फेरीवाल्यांच्या अरेरावीमुळे त्यांचे परवानेच रद्द करत महापालिकेने मुजोर फेरीवाल्यांना चांगलीच अद्दल घडवली आहे. फॅशन स्ट्रीट येथील परवानाधारक फेरीवाल्यांकडून नियमांचे उल्लंघन करून कपडे बाहेर लटकवून अतिक्रमण केले जात होते. याबाबत महापालिकेने वारंवार समज देऊनही फेरीवाल्यांकडून याची दखल घेतली जात नव्हती. फॅशन स्ट्रिटवर एकूण 394 परवानाधारक फेरीवाले आहेत. यासर्वांकडून पदपथ दोन्ही बाजूंनी अडवून अतिक्रमण केले जात असल्यामुळे महापालिकेच्या ‘ए’ विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी या सर्वांना नोटीस बजावून आखून दिलेल्या 1 बाय 1 मीटरच्या क्षेत्रातच व्यवसाय करावा, अशी सूचना केली. परंतु वर्षांनंतरही फेरीवाल्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्यामुळे या सर्व फेरीवाल्यांचा निरिक्षण अहवाल तयार करून त्यातील 49 फेरीवाल्यांचा परवाना रद्द करण्यात येत असल्याची नोटीस बजावल्याची माहिती सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

परवाना रद्द केल्यानंतर संबंधित फेरीवाला ज्या जागी व्यवसाय करत होता, त्या जागेवरील लाकडी खोका, पेटी तेथून 24 तासांच्या आत काढून टाकण्यास सांगितले आहे. त्यांनी हा लाकडी खोका, पेटी न काढल्यास सोमवारी नोटीशीप्रमाणे या अनधिकृत स्टॉल्सवर कारवाई करण्यात येईल, असे दिघावकर यांनी स्पष्ट केले.

परवानाधारक फेरीवाल्यांनी महापालिकेच्या नियमांचे पालन करून धंदा केल्यास त्यांच्याविरोधात महापालिकेच्यावतीने कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही. परंतु महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन केले जाणार असेल, तर त्यांची गय केली जाणार नाही. येथील उर्वरीत परवानाधारक फेरीवाल्यांवरही कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले जाणार असल्याचे दिघावकर यांनी सांगितले.

परवाना रद्द करण्याची कारणे -
० व्यवसाय करण्यास दिलेल्या जागेवर खुद्द परवानाधारक स्वत: हजर नसतात
० जागेमध्ये लोखंडीपाईप, लाकडी बांबू व ताडपत्रीच्या सहाय्याने अनधिकृत वाढ करून टांगण्या लावून वस्तूंचे प्रदर्शन करणे
० परवाना असलेल्या जागेवर बसून व्यवसाय करणे आवश्यक असताना त्याठिकाणी लाकडी खोका, पेटी ठेवणे
० मोजून दिलेल्या जागेव्यतिरिक्त अधिक जागा वापरुन अतिक्रमण करणे
० परवानगी दिलेल्या व्यवसायाच्या वस्तूंची विक्री करण्याऐवजी इतर वस्तूंची विक्री करणे

नरिमन पॉईंटमध्ये सिगारेट विक्रेत्यांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स -
नरिमन पॉईंट येथील स्टेटस हॉटेलजवळील 45 फेरीवाल्यांकडे परवाने असून त्यातील 22 फेरीवाल्यांकडे पान बिडी विक्रीचा परवाना आहे. परंतु प्रत्यक्षात पान बिडीचा परवाना असलेले
हे विक्रेते दाबेली, सॅण्डविच तसेच अन्यप्रकारचे खाद्यपदार्थ विकत असल्याचे प्रथम निरीक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे त्यांनाही नोटीस जारी करण्यात येणार असून त्यानंतरही त्यांनी नियमानुसार व्यवसाय न केल्यास त्यांचेही परवाने रद्द करण्यात येतील, असे दिघावकर यांनी स्पष्ट केले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.