Advertisement

बॉम्बे हॉस्पिटलला पोहोचाल वेळेत! रस्ता रुंदीकरणाचं काम प्रगतीपथावर

‘बॉम्बे हॉस्पिटल’कडे जाणारे रस्ते एकमार्गी असल्याने याठिकाणी रुग्णांना घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिका आणि वाहनांना चर्चगेटला वळसा घालून हाॅस्पिटलमध्ये यावं लागतं. हॉस्पिटलकडे जाणाऱ्या मार्गाचं रुंदीकरण करण्यात येणार असल्याने रुग्णवाहिकांना यापुढे चर्चगेटला वळसा घालून येण्याची गरज भासणार नाही.

बॉम्बे हॉस्पिटलला पोहोचाल वेळेत! रस्ता रुंदीकरणाचं काम प्रगतीपथावर
SHARES

दक्षिण मुंबईतील ‘बॉम्बे हॉस्पिटल’कडे जाणारे रस्ते एकमार्गी असल्याने याठिकाणी रुग्णांना घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिका आणि वाहनांना चर्चगेटला वळसा घालून हाॅस्पिटलमध्ये यावं लागतं. हॉस्पिटलकडे जाणाऱ्या मार्गाचं रुंदीकरण करण्यात येणार असल्याने रुग्णवाहिकांना यापुढे चर्चगेटला वळसा घालून येण्याची गरज भासणार नाही.


वेळत उपचारांना अडथळा

दक्षिण मुंबईतील मरिन लाइन्स परिसरात 'बॉम्बे हॉस्पिटल' आहे. देशभरातील रुग्ण या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत असतात. हे रुग्णालय 'विठ्ठलदास ठाकरसी मार्ग' (पूर्वीचे अमेरिकन सेंटर असणारा मार्ग) व ‘बॉम्बे हॉस्पिटल लेन’ या दोन रस्त्यांवर आहे. मात्र या दोन्ही रस्त्यांवर एकेरी वाहतूक असल्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना व रुग्णवाहिकांना चर्चगेट पर्यंत फेरा घालून रुग्णालयात यावं लागतं. परिणामी रुग्णांची मोठी गैरसोय होऊन त्यांना वेळेवर उपचार होण्यातही अडथळा निर्माण होतो.


रस्त्याची रूंदी वाढणार

‘बॉम्बे हॉस्पिटल लेन’ या २०१ मीटर लांबीच्या रुंदीकरणाची ‘रस्ता रेषा’ सन १९६७ मध्ये आखण्यात आली होती. ज्यामुळे १२.३० मीटर (४० फूट) रुंदीच्या या रस्त्याची रुंदी २१.३४ मीटर (७० फूट) पर्यंत वाढविणं शक्य असल्याने या लेनच्या रुंदीकरणाचं काम हाती घेण्यात आलं. त्यानुसार सध्याच्या १२.३० मीटर रुंदी असणाऱ्या या रस्त्याची रुंदी वाढून २१.३४ मीटर एवढी होणार आहे.



अडथळे केले दूर

या रस्ता रुंदीकरणाच्या आड येणारी दुकाने यापूर्वीच स्थानांतरीत करण्यात आली आहेत. तर रस्त्याच्या एका बाजूला असणारी परंतु रुंदीकरणाआड येणाऱ्या विहिरीवर देखील 'स्लॅब' टाकून ती झाकण्यात येणार आहे. परंतु विहिरीतून पाणी काढण्यासाठी झाकणाची व्यवस्था त्यात असेल. या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम मार्च महिन्यात पूर्ण होऊन या रस्त्यावरुन दुतर्फा वाहतूक सुरु होईल, अशी माहिती ‘ए’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.


दुतर्फा वाहतूक होईल सुरू

या रस्त्याचं रुंदीकरण करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथ आणि रस्त्याच्या मधोमध दुभाजक देखील बांधण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच या रस्त्यावर दुतर्फा वाहतूक सुरु होऊ शकेल. या रस्त्यावर दुतर्फा वाहतूक सुरु झाल्यानंतर ‘क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके’ चौकातून (मेट्रो चौक) महात्मा गांधी मार्गावरुन उजवं वळण घेऊन ‘बॉम्बे हॉस्पिटल लेन’ या मार्गाने थेट ‘बॉम्बे हॉस्पिटल’ मध्ये येणं शक्य होणार आहे. ज्यामुळे रुग्णवाहिकांचा चर्चगेट पर्यंतचा फेरा वाचेल, असंही दिघावकर यांनी स्पष्ट केलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा