Advertisement

फेरीवाल्यांसाठी बायोमेट्रिक कार्ड, दुसऱ्यानं वापरल्यास कार्ड होणार रद्द


फेरीवाल्यांसाठी बायोमेट्रिक कार्ड, दुसऱ्यानं वापरल्यास कार्ड होणार रद्द
SHARES

मुंबईतील फेरीवाल्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार प्राप्त ९९ हजार ४३५ अर्जांची माहिती संकलन आणि छाननीचं काम आता अंतिम टप्प्यात आहे. यातील पात्र फेरीवाल्यांना आधार लिंक करून लवकरच बायोमेट्रीक कार्ड वितरीत करण्यात येणार आहे. त्यामुळे बायोमेट्रीक कार्ड मिळाल्यानंतर जागा बदलून व्यवसाय केल्यास आणि अन्य कुणाला आपल्या जागेवर उभं करून व्यवसाय करताना आढळून आल्यास त्वरीत बायोमेट्रीक कार्ड रद्द करण्यात येईल.


महापालिका राबवते ही मोहीम

मुंबई राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून जुलै २०१४ मध्ये सर्व भागांमधील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. यामध्ये एकूण सव्वा लाख अर्जांची विक्री झाली होती. त्यातून केवळ ९९ हजार ४३५ अर्ज महापालिकेला प्राप्त झाले. न्यायालयात याबाबतची याचिका असल्याने नोव्हेंबर २०१७ रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर यासर्व अर्जांची संगणकीय माहिती संकलन (डेटा एन्ट्री) आणि छाननी करणे तसेच योजनेतील निकषांच्या आधारावर पात्र ठरणाऱ्या फेरीवाल्यांची नोंदणी करून त्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्याची मोहीम महापालिकेतर्फे राबवली जात आहे.


पडताळणीचं काम सुरू

प्राप्त झालेल्या अर्जांची माहिती संकलन होऊन त्यांच्या छाननीचं काम अंतिम टप्प्यात असून त्यानुसार पात्र फेरीवाल्यांची नोंदणी केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. याबाबत उपायुक्त (फेरीवाला निर्मुलन) निधी चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, २०१४च्या सर्वेक्षण यादीतील अर्जांच्या पडताळणीचं काम अद्याप सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.


मशीनही होणार उपलब्ध

यामध्ये जे अर्जदार पात्र ठरतील त्या फेरीवाल्यांची नोंदणी करून त्यांना बायोमेट्रीक कार्ड दिलं जाईल. हे बायोमेट्रीक कार्ड आधार कार्डशी लिंक असेल. यामध्ये अर्जात फेरीवाल्याने ज्या व्यावसायाचा उल्लेख केला आहे, किंबहुना कुठल्या भागात बसणार आहे, त्याची नोंद केली जाणार आहे. त्यामुळे बायोमेट्रीक कार्ड दिल्यानंतर महापालिकेच्या परवाना निरीक्षकांना बायोमेट्रीक कार्डची तपासणी करण्यासाठी मशीनही उपलब्ध करून दिलं जाणार आहेत.


असं केल्यास कार्ड होईल जप्त

या मशीनच्या माध्यमातून ते प्रत्येक फेरीवाल्यांचे कार्ड तपासतील. यामध्ये जर त्यांना धंदा वेगळीच व्यक्ती करत आहे, आणि कार्ड दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर आहे, असं आढळल्यास तेथील ५ फेरीवाल्यांच्या साक्षीने पंचनामा करून त्यांचे कार्ड जप्त करून रद्द केलं जाईल. ज्याच्या नावावर हे कार्ड असेल त्याला, त्याची आई, वडील, भाऊ, बहीण, अशाप्रकारे कुणालाही या कार्डवर व्यवसाय करता येईल. पण याव्यतिरिक्त जर अन्य कुणी आढळून आल्यास त्यांचं कार्ड रद्द केलं जाईल. यासाठी त्यांना नातेवाईक असल्याचं कागदोपत्री दाखवून द्यावं लागेल. त्यानंतरच त्यांना पुन्हा बायोमेट्रीक कार्ड दिलं जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. हे कार्ड ज्या जागेवर दिलं आहे, त्याव्यतिरिक्त अन्य जागेवर वापरण्याचा प्रयत्न केल्यासही ते कार्ड रद्द केलं जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा