Advertisement

महापालिका ३ वर्षांत पेग्विन देखभालीसाठी करणार १५ कोटींचा खर्च

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान-प्राणीसंग्रहालयातील पेंग्विनच्या देखभालीसाठी महापालिका ३ वर्षात १५ कोटी २४ लाख रुपये खर्च केला जाणार आहे.

महापालिका ३ वर्षांत पेग्विन देखभालीसाठी करणार १५ कोटींचा खर्च
SHARES

दक्षिण मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान-प्राणीसंग्रहालयातील (राणी बाग) पेंग्विन देखभालीसाठी महापालिका पुढील ३ वर्षांमध्ये १५ कोटी २४ लाख रुपये खर्च करणार आहे. त्या निविदा प्रक्रियेत सध्याच्या कंत्राटदाराचीच एकमेव निविदा दाखल झाली आहे. त्यावर बुधवारच्या महापालिकेच्या स्थायी समितीत विधानपरिषद निवडणूक आचारसंहितेमुळं निर्णय होऊ शकलेला नाही.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान-प्राणीसंग्रहालयातील पेंग्विनच्या देखभालीसाठी महापालिका ३ वर्षात १५ कोटी २४ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. त्यामुळं एका दिवसामागे साधारण १ लाख ४१ हजार रुपये खर्च होणार आहे. महापालिकेनं त्यासाठी मागविलेल्या निविदा प्रक्रियेत सध्याच्याच कंत्राटदारच सहभागी झाला होता.

त्यापूर्वी, पहिल्या वेळेस २ कंत्राटदार सहभागी झाले होते. त्या प्रक्रियेत, एकाच कंत्राटदाराची निविदा प्रतिसादात्मक ठरल्याने ती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. महापालिकेनं पेंग्विन देखभालीच्या उद्देशानं काही महिन्यांपूर्वी निविदा मागवल्या होत्या. त्यातील खर्चावरून वाद निर्माण झाल्यानं महापालिकेनं निविदा प्रक्रियेत सुधारणा करताना त्यामधील काही कामं कमी केली होती. त्यानंतर महापालिकेनं दोनदा मागविलेल्या निविदांमध्ये केवळ एकाच कंत्राटदाराने प्रतिसाद दिला. तेव्हा महापालिकेनं निविदेत सहभागी झालेल्या कंपनीस कंत्राट देण्याचा निर्णय घेतला.

त्याबाबतचा प्रस्ताव बुधवारच्या स्थायी समितीसमोर मांडण्यात आला. मात्र, विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या राणीच्या बागेत नऊ पेंग्विन असून ३ वर्षांच्या काळात नव्या पेंग्विनचा जन्म झाल्यास कंत्राटदाराकडून त्याच्या देखभालीसाठी कोणताही ज्यादा खर्च मागितला जाणार नसल्याचं महापालिकेनं प्रस्तावात नमूद केलं आहे. इतर संपूर्ण कामात जीवरक्षक प्रणाली, पशुवैद्यकीय सेवा, खाद्य, विद्युत यंत्रणा, वातानुकूलित यंत्रणाची कामे आदींचा समावेश आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा