Advertisement

झाडांची मुळं होणार मोकळी : ऑक्टोबरपासून काँक्रिटचा नाही तर मातीचा भराव


झाडांची मुळं होणार मोकळी : ऑक्टोबरपासून काँक्रिटचा नाही तर मातीचा भराव
SHARES

सिमेंट काँक्रिटच्या या जंगलात झाडांचं आयुष्यचं आता कमी होऊ लागलंय. त्यामुळे चांगली दिसणारी झाडंही आता मुळांची वाढ योग्यप्रकारे होत नसल्यामुळे उन्मळून पडू लागलीय. झाडांचं हे आयुष्य वाढवण्यासाठी आता रस्त्यालगतच्या झाडांची मुळंच मजबूत केली जाणार आहे. याकरता झाडांच्या मुळांभोवतीचा सिमेंट काँक्रिट तसेच पेव्हर ब्लॉकचा थर काढला जाणार असून झाडांभोवती पुन्हा एकदा मातीचा थर वाढवून मुळांना संरक्षण दिलं जाणार आहे.


म्हणून झाडं उन्मळून पडतात

संपूर्ण मुंबईत सुमारे २९ लाख ७५ हजार झाडं असून रस्त्यालगतच १ लाख ८५ हजार झाडं आहेत. परंतु रस्त्यालगत असलेली अनेक झाडे ही सिमेंट काँक्रिटीकरण, डांबरीकरण तसेच पेव्हरब्लॉकमुळे कमकुवत बनली आहे. याशिवाय रस्त्यालगत होणारी पर्जन्य जलवाहिनी, जलवाहिनी तसेच मलनि:सारण वाहिन्यांच्या कामांमुळे होणाऱ्या खोदकामांमुळेही जमिनीत लांबवर पसरणारी मुळंच कापली जात आहे. त्यामुळे झाडं मजबूत उभी राहत नाही. त्यामुळे वादळी वाऱ्यानेही ती उन्मळून पडतात. झाडांची वाढ होत नसल्यामुळे आता झाडांच्या मुळांवर असलेलं काँक्रिट आणि पेव्हरब्लॉकचा भागच मोकळा केला जाणार आहे.


काँक्रिटचा थर काढणार

रस्त्यांलगतची झाडं मजबूत स्थितीत उभी राहावी यासाठी मुळाच्या भोवतीचा परिसर मोकळा केला जाणार आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यांपासून मुंबईतील सर्व झाडांच्या मुळांवरील काँक्रिटचा थर काढून त्यावर माती टाकून हिरव्या गवतांनी झाडांच्या मुळाचा परिसर सुशोभित केला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिली आहे.

अभ्यास करण्याच्या सूचना

झाडांच्या मुळाभोवतीचा किती भाग मोकळा करून त्यावर मातीचा भराव टाकला जावा, याबाबत उद्यान विभागाला अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार किती चौरस फुटाचा भाग मोकळा करावा, याबाबत निश्चित धोरण बनवलं जातं असून त्यानुसार मुंबईतील सर्व रस्त्यालगतची झाडांच्या भोवताली मातीचा थर टाकून त्यांचं सुशोभिकरण केलं जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा