उंदीर मारायला पालिकेकडे यंत्रणा अपुरी?

 Mumbai
उंदीर मारायला पालिकेकडे यंत्रणा अपुरी?
Mumbai  -  

शहरातील कचऱ्यावर पोसल्या जाणाऱ्या आणि लेप्टोस्पायरोसिस या आजाराच्या प्रादुर्भावाला कारणीभूत ठरणाऱ्या उंदरांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई महापालिकेने पावसाळ्यापूर्वीच उंदीर मारण्याची मोहीम फत्ते करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिकेने प्रति मृत उंदरामागे 18 रुपये दर दिला आहे. मुंबईतील 24 महापालिका विभागांपैकी फक्त 5 विभागांमध्ये उंदीर मारण्याचे काम सुरू करण्यात आले असून, उर्वरित पालिका विभागांमध्ये अपुऱ्या यंत्रणेमुळे काम सुरू झाले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

2015 मध्ये जून महिन्यात लेप्टोस्पायरोसिस या साथीच्या आजाराने डोके वर काढले होते. त्यामुळे मुंबईत 12 नागरिकांनी आपले प्राण गमावले होते. गेल्या वर्षी लेप्टोस्पायरोसिसच्या साथीमध्ये 7 जण दगावले होते. लेप्टोस्पायरोसिसचे विषाणू गुरे, कुत्रे आणि उंदीर यांच्या मलमूत्राद्वारे पसरतात. त्यामुळे गुरांचे लसीकरण करण्याबरोबरच कुत्रे आणि उंदरांची संख्या नियंत्रणात असणे आवश्यक आहे. मुंबई महापालिकेकडे केवळ 30 मूषकसंहारक आहेत. त्यांना दर दिवशी 30 उंदीर मारण्याचे उद्दीष्ट दिले जाते. मात्र तरीही संपूर्ण मुंबई शहरातील उंदरांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी ही संख्या अपुरी पडते. त्यामुळे गेल्या वर्षी पावसाळ्यात उंदीर मारण्यासाठी खासगी कंत्राटदार नेमण्याचा विचार झाला. त्यासाठी प्रत्येक उंदरामागे 10 रुपये दर ठरवला गेला. मात्र तीन वेळा निविदा काढूनही संस्थांनी या कामासाठी प्रतिसाद दिला नाही. अखेर डिसेंबरमध्ये प्रत्येक उंदरामागे 10 ऐवजी 18 रुपये देण्याचे ठरले. तरीही हे काम करण्यासाठी कोणीही रस दाखवला नाही.

सध्या उंदीर पकडण्याचे 4 पालिका वॉर्डमध्ये काम सुरू आहे. ई,एस, जी दक्षिण, एल या विभागात काम सुरू करण्यात आले असून, एक उंदीर पकडण्यासाठी 18 रुपये देण्यात आले आहेत. सहकारी स्वच्छ मुंबई प्रबोधक संस्था सध्या या वॉर्डमध्ये काम करत असल्याचे कीटकनाशक विभागाचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांनी सांगितले.

Loading Comments