Advertisement

मुंबईत पाणी साचण्याची २६ ठिकाणे होणार कमी


मुंबईत पाणी साचण्याची २६ ठिकाणे होणार कमी
SHARES

मुंबईत दर पावसाळ्यात तब्बल ९८ ठिकाणी पाणी साचत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर यावर्षी पाणी साचणाऱ्या ठिकाणांपैकी तब्बल २६ ठिकाणे कमी करण्याचं लक्ष्य महापालिका प्रशासनाने बाळगलं आहे. त्यानंतर उर्वरीत ठिकाणेही टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.


कुठे काम सुरू?

यावर्षी पावसाळ्यात मुंबईत एकूण ९८ पाणी साचण्याची ठिकाणे आढळली होती. या ९८ ठिकाणी पाणी साचू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी यापूर्वीच सर्व परिमंडळीय उपायुक्तांना दिले होते. त्यानुसार सध्या २६ ठिकाणचं काम प्रगतीपथावर आहे. या २६ ठिकणांपैकी ११ ठिकाणे शहर भागात, ६ ठिकाणे पूर्व उपनगरात; तर ९ ठिकाणे ही पश्चिम उपनगरात असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मुख्यालयात सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त तसेच सहायक आयुक्त यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पर्जन्य जलवाहिनी विभागाने आयुक्तांच्या आदेशानुसार कशाप्रकारे काम केलं जात आहे, अशी माहिती आयुक्तांना दिली.


संयुक्त पाहणी

पाणी साचणाऱ्या ९८ ठिकाणांपैकी २६ ठिकाणांची उपाययोजना करण्यात आल्यानंतर उर्वरीत ७२ ठिकाणांबाबतही आयुक्तांनी सूचना दिल्या आहे. या उर्वरीत ७२ ठिकाणांपैकी २७ ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने निविदा प्रक्रिया सुरु आहे. तसेच उर्वरित सर्व ४५ ठिकाणांबाबत महापालिकेच्या विविध खात्यांचा संयुक्त पाहणी दौरा व संयुक्त बैठका आयोजित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी शनिवारच्या बैठकीदरम्यान दिले.


कुणाच्या विभागात?

विशेष म्हणजे या ४५ ठिकाणांपैकी १२ ठिकाणे ही सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, रेल्वे इत्यादींशी संबंधित आहेत. त्यामुळे संयुक्त पाहणी दौऱ्यांमध्ये व बैठकांमध्ये त्यांनाही सहभागी करुन घ्यावं, असे आदेश आजच्या बैठकीदरम्यान देण्यात आले. या ४५ ठिकाणांपैकी शहर भागात व पूर्व उपनगरात प्रत्येकी १९ ठिकाणे असून पश्चिम उपनगरात ७ ठिकाणे आहेत.


पाणी साचणारी ९८ ठिकाणे

  • ३७ शहर भाग
  • ३४ पूर्व उपनगर,
  • २७ पश्चिम उपनगर
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा