Advertisement

मुंबईतल्या चौपाट्या होणार चकाचक, 'फ्लोटींग ट्रॅश बूम्स' अडवणार कचरा

घाण- कचऱ्यामुळे समुद्रातील प्रदूषणात मोठी भर पडत चालली अाहे. ही प्रदूषणाची समस्या दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने समुद्राला येऊन मिळणाऱ्या नाल्यांच्या मुखावरच ‘फ्लोटींग ट्रॅश बूम्स’ बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतल्या चौपाट्या होणार चकाचक, 'फ्लोटींग ट्रॅश बूम्स' अडवणार कचरा
SHARES

मुंबईतील नदी- नाले, गटार आणि खाडीतलं वाहतं पाणी थेट समुद्राला जाऊन मिळतं. या पाण्यातील घाण- कचऱ्यामुळे समुद्रातील प्रदूषणात मोठी भर पडत चालली अाहे. ही प्रदूषणाची समस्या दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने समुद्राला येऊन मिळणाऱ्या नाल्यांच्या मुखावरच ‘फ्लोटींग ट्रॅश बूम्स’ बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील समुद्र किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात तरंगता कचरा लाटेबरोबरच चौपाटीवर फेकला जातो. परिणामी चौपाट्यांवर अस्वच्छता पसरते. चौपाट्यांवर दैनंदिन स्वच्छता ठेवण्यात येत असली, तरीही दरदिवशी नदी व खाडींच्या मुखातून समुद्राच्या पोटात गेलेला कचरा लाटेबरोबरच बाहेर फेकला जातो.



कुठे बसवणार 'फ्लोटींग ट्रॅश बूम्स'

त्यामुळे समुद्रात तसेच खाडीमध्ये शिरणाऱ्या तरंगत्या कचऱ्यास अटकाव घालण्यासाठी दहिसर, पोयसर, ओशिवरा व मिठी नद्यांच्या पातमुखांवर ‘फ्लोटींग ट्रॅश बूम्स’बसवले जाणार आहेत. या व्यवस्थेमुळे तरंगत्या कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या घाणीमुळे समुद्रकिनारे तसेच किनारे वाचतील, असा विश्वास महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी व्यक्त केला आहे.


'फ्लोटींग ट्रॅश बूम्स' म्हणजे काय?

फ्लोटींग ट्रॅश बूम्स म्हणजे 'प्लॅस्टिक ड्रम्स' एका दोरीला बांधून पाण्याच्या प्रवाहावर निर्माण केलेला बांध. नदीच्या मुखातून जिथे हा पाण्याचा प्रवाह समुद्रात शिरतो, तिथे एका दोरीत 'प्लॅस्टिक ड्रम्स' मण्यांची माळ ओवावी त्याप्रमाणे बांधले जातात. त्या ड्रम्सच्या खालील बाजूस मासेमारीच्या जाळीप्रमाणं जाळं बसवून त्याला आधार म्हणून जड वजन बांधलं जातं.

यामुळे ड्रम्स आणि जाळीमुळे ४ फुटाच्या अंतरापर्यंत तरंगता कचरा अडून समुद्रात जाण्यापासून रोखता येतो . त्यानंतर हा कचरा तिथंच बाहेर काढला जातो. त्यामुळे तरंगता कचरा समुद्रात जात नाही आणि तरंगत्या कचऱ्यापासून समुद्र चौपाट्या अस्वच्छ होत नाहीत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा