Advertisement

कचऱ्यापासून निर्माण झालेलं खत शेतकऱ्यांना मोफत


कचऱ्यापासून निर्माण झालेलं खत शेतकऱ्यांना मोफत
SHARES

मुंबई शहरात सोसायट्या आणि उपहारगृह असलेल्या ठिकाणी ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचं प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे या खतांचा योग्य वापर करण्यासाठी ते शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून दिलं जाणार आहे. एम-पूर्व विभागातील कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या खताचा वापर शेतकऱ्यांकडून केला जात असल्यानं महापालिकेनं हे खत शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला असून हे खत देवनार आणि कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर ठेवण्याचं निर्देश महापलिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत.


यासाठी घेतली बैठक

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मुख्यालयात सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, विभागांचे सहायक आयुक्त तसेच खात्यांचे प्रमुख यांची मासिक आढावा बैठक पार पडली. या बैठकीत महापालिका आयुक्तांनी हे निर्देश दिले आहेत.महापालिकेकडून कार्यवाही सुरू

मुंबईत निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने महापालिकेनं सर्वस्तरावर कार्यवाही सुरू केली आहे. याच कार्यवाहीचा भाग म्हणून मोठ्या सोसायट्या, उपहारगृहे इत्यादींना त्यांच्या परिसरातील ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारे प्रकल्प उभारण्याचे आदेश यापूर्वीच दिले होते. यानुसार मुंबईत अनेक ठिकाणी ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारे प्रकल्प सुरू झाले आहेत. यामधून दररोज मोठ्या प्रमाणात खतनिर्मितीदेखील होत असल्याची माहिती या आढावा बैठकीत देण्यात आली.


उद्यानांसाठी खत खरेदीची गरज नाही

या ओल्या कचऱ्यापासून प्राप्त होणाऱ्या खताचा योग्य वापर व्हावा, यासाठी महापालिकेनं यापूर्वीच पुढाकार घेऊन आपल्या उद्यानांमधील झाडांसाठी खत विकत घेणं बंद केलं आहे.
त्याऐवजी महापालिकेच्याच परिसरातील ओल्या कचऱ्यापासून प्राप्त होणाऱ्या खताचा वापर पालिका उद्यानांमध्ये केला जात आहे. तसेच 'एम पूर्व' विभागातील महापालिकेच्या एका प्रकल्पात तयार होणारे खत हे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतांमध्ये वापरलं जात आहे.

याच धर्तीवर महापालिका क्षेत्रातील मोठ्या सोसायट्या/ उपहारगृहे इत्यादी परिसरातील ओल्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या खताचा सुयोग्य वापर होण्याच्या दृष्टीने हे खत देवनार किंवा कांजूरमार्ग येथील क्षेपणभूमीजवळील परिसरात ठेऊन शेतकरी बांधवांना ते मोफत उपलब्ध करून द्यावं, असं आयुक्तांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

संबंधित विषय