Advertisement

प्राण्यांपासून कसा होतो माणसांना आजार? मुंबई महापालिका घेणार शोध

सार्वजनिक आरोग्याचा विचार करताना महापालिकेने पशुवैद्यकीय बाबींसाठी स्वतंत्र खाते तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हे खातं प्राण्यांपासून माणसांना होणाऱ्या आजाराचा शोध घेऊन आजाराला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न करणार आहे.

प्राण्यांपासून कसा होतो माणसांना आजार? मुंबई महापालिका घेणार शोध
SHARES

माणसाला होणाऱ्या आजारांपैकी ३०० हून अधिक आजार हे प्राण्यांचं निकृष्ट दर्जाचं मांस खाऊन किंवा त्यांच्या मलमूत्रापासून माणसाला होतात. या आजारांना 'झूनॉटिक डिसिजिस' असं म्हटलं जातं. या आजारांमध्ये लेप्टोस्पायरोसिस, रेबीज,अॅन्थ्रॅक्स, स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू यांसारख्या घातक आजारांचा समावेश आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचा विचार करताना महापालिकेने पशुवैद्यकीय बाबींसाठी स्वतंत्र खाते तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हे खातं प्राण्यांपासून माणसांना होणाऱ्या आजाराचा शोध घेऊन आजाराला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न करणार आहे.


महापालिकेची मंजुरी

महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्यासाठी कार्यरत असणाऱ्या सार्वजनिक आरोग्य खात्याप्रमाणेच महापालिका क्षेत्रातील पाळीव प्राणी व भटकी जनावरे यांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र 'पशुवैद्यकीय आरोग्य खाते' (Veterinary Health Department) सुरु करण्यास महापालिकेची मंजुरी मिळाली आहे. यामुळे आता पाळीव प्राणी व भटकी जनावरे यांच्यासाठी देण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधा एकाच छताखाली आल्या आहेत.


कुठल्या विभागांचा समावेश?

या खात्याअंतर्गत अत्याधुनिक पशुवैद्यकीय रुग्णालय, पशुवैद्यकीय दवाखाने, प्राण्यांपासून माणसांना होणाऱ्या रोगांसाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा (Zoonotic Diseases), देवनार पशुवधगृह, प्राणी-गणना, श्वान नियंत्रण कार्यालय (Dog Control Office),श्वान निर्बिजीकरण, श्वान अनुज्ञप्तीपत्र (Dog License), कुत्रे व मांजरांसाठी स्मशानभूमी, गुरे कोंडवाडा विभाग इत्यादींचा समावेश असणार असल्याची माहिती देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. योगेश शेट्ये यांनी दिली.


प्राणी गणनेची जबाबदारी

देशपातळीवर करण्यात येणाऱ्या प्राणीगणनेअंतर्गत महापालिका क्षेत्रातील प्राण्यांच्या गणनेचं नियोजन व अंमलबजावणीशी संबंधित विविध बाबींदेखील नव्याने तयार करण्यात येणाऱ्या खात्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.


भटक्या कुत्र्यांची संख्या मोठी

वर्ष २०१२ मध्ये करण्यात आलेल्या १९ व्या पशुगणनेनुसार बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील ४० हजार ५९८ कुटुंबांमध्ये पाळीव जनावरे आहेत. ही संख्या वाढत्या शहरीकरणाबरोबर आणि वाढत्या लोकसंख्येसोबत वाढत आहे. तसंच मुंबईत भटक्या जनावरांची संख्या देखील मोठी आहे. या पाळीव प्राण्यांच्या किंवा भटक्या जनावरांच्या आरोग्याबाबत अथवा रोगांबाबत तपशील संकंलित करण्यासही स्वतंत्र खात्यामुळे चालना मिळणार असल्याचा विश्वास डॉ. शेट्ये यांनी व्यक्त केला.



हेही वाचा-

आस्थापना विभागाची महाचूक : महापालिका कर्मचारी गटविमा, पेन्शनपासून वंचित

निपाह व्हायरसमुळे मुंबईसह पुण्यात अलर्ट



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा