आख्ख्या मुंबईत फक्त 39 खड्डे !

  Pali Hill
  आख्ख्या मुंबईत फक्त 39 खड्डे !
  मुंबई  -  

  मुंबई – गणेशोत्सवात खड्डेमुक्त मुंबई करण्याचं महापालिकेचं आश्वासन हवेतच विरलंय. पालिकेच्याच अहवालानुसार मुंबईत तब्बल 4 हजार 293 खड्डे होते. गणेश विसर्जनाआधी मुंबईतले सर्व खड्डे बुजवले जातील आणि गणेश विसर्जनात कोणतेही विघ्न येऊ दिले जाणार नाहीत अशी राणा भीमदेवी थाटात पालिकेनं गर्जना केली होती. त्यानुसार खड्डे बुजवण्याची मोहीम जोरकसपणे राबवण्यातही आली. पण अजूनही मुंबईकरांमागे लागलेलं खड्ड्यांचं शुक्लकाष्ट संपण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. पालिका अधिकारी मात्र याविषयी वेगळाच सूर आळवतायत. मुंबईत फक्त 39 खड्डे बुजवायचे राहिलेत असा अहवालच पालिकेत सादर झालाय. सामान्य मुंबईकर खड्ड्यांमुळे रोज सहन करत असलेल्या यातना पहाता मुंबईकरांचा या अहवालावर विश्वास बसणं कठीणच आहे. शिवाय खड्डे बुजवण्याचं होत असलेलं निकृष्ट कामही मुंबईकर याची देही याची डोळा पहात आहेत. त्यामुळे पालिकेचे अधिकारी या अहवालातून जनतेची फसवणूक तर करत नाहीत ना असा प्रश्न सामान्य मुंबईकर विचारू लागलेत. शिवाय 39 खड्ड्यांचा अहवाल सादर करणारे अधिकारी आणि तो अहवाल स्विकारणारी पालिका यांनी डोळ्यांवरची पट्टी काढून प्रत्यक्ष रस्त्यावर उतरूनच खड्ड्यांची मोजणी करावी अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.