Advertisement

सुधार समितीत भूखंडाचे श्रीखंड, महापालिकेची जागा खासगी विकासकाला आंदण


सुधार समितीत भूखंडाचे श्रीखंड, महापालिकेची जागा खासगी विकासकाला आंदण
SHARES

मुंबई महापालिका खासगी विकासकावर चांगलीच मेहेरबान झालेली असून, चक्क महापालिकेच्या भूखंडातील काही जागा खासगी विकासकाला देऊन टाकण्यात आली आहे. सुधार समितीच्या सदस्यांनी या जागेची पाहणी केल्यानंतरही त्यांनी प्रत्यक्ष बैठकीत एक चकार शब्दही न काढता जमिनीचा पट्टा खासगी विकासकाला भाडेपट्टयावर देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. खासगी विकासकासाठी महापालिकेच्या वाचनालय आणि समाजकल्याण केंद्राची जागा देऊन एकप्रकारे सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांच्यासहित सर्वच सदस्यांनी भूखंडाचे श्रीखंड दिवाळीपूर्वी चाखले. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षासह पहारेकरी म्हणवणाऱ्या भाजपाचे सात सदस्य बैठकीत असूनही त्यांनी कोणताही विरोध न करता शिवसेनेसह भूखंडाचे श्रीखंड लुटले.


६० मीटर क्षेत्रफळाची जागा

माहिममधील दिलीप गुप्ते मार्गावरील माहिम वाचनालयाच्या शेजारील भूभाग क्रमांक ८१ वर असलेली जुनी धोकादायक इमारत पाडून त्याठिकाणी शगुन बिल्डर्सच्या माध्यमातून पुनर्विकासाचे काम सुरु आहे. या पुनर्विकास प्रकल्पासाठी महापालिकेच्या मालकीचा भूभाग क्रमांक ८२ मधून ४.५ मीटर रुंदीचा ६० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर पोहोच मार्ग उपलब्ध करून देण्याची विनंती विकासकाच्या वास्तुशास्त्रज्ञाने केली होती. या विनंतीनुसार या मार्गासाठी जागा देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. रस्त्यांसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास, त्यासंबंधीचे सर्व शुल्क महापालिकेला भरण्याची तयारी विकासकाने दर्शवली होती. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी सुधार समितीच्या बैठकीपुढे ठेवण्यात आला आहे.


पाहणीनंतरही सदस्यांचे मौन

चार दिवसांपूर्वी सुधार समितीचे अध्यक्ष बाळा नर, स्थापत्य समिती अध्यक्षा विशाखा राऊत, प्रकाश गंगाधरे, विठ्ठल लोकरे यांच्यासह समिती सदस्यांनी जागेची पाहणी केली. मात्र, प्रत्यक्षात मंगळवारी झालेल्या सुधार समितीच्या बैठकीत समिती अध्यक्ष बाळा नर यांनी हा प्रस्ताव पुकारल्यानंतर एकाही सदस्याने प्रशासनाला सवाल केला नाही.

 

सुधार समितीने केले विकासकाचे स्वप्न साकार

पहारेकरी म्हणवणारे प्रकाश गंगाधरे यांच्यासह विरोधी पक्षातील विठ्ठल लोकरे यांनी चक्क मिठाची गुळणी तोंडात घ्यावी, त्याप्रमाणे तोंड बंद करून घेतले होते. त्यामुळे समितीच्या बैठकीत यावर निर्णय घेऊ असे सांगणाऱ्या बाळा नर यांनी हा प्रस्ताव कोणतीही हरकत न घेता मंजूर केला आणि महापालिकेच्या मालकीच्या भूखंडाची साडेचार मीटर रुंदीची ६० मीटरची जागा देण्याचा मार्ग खुला केला. महापालिकेचा भूखंड जर तिथे नसता, तर विकासकाने कुठून जागा घेतली असती? हा प्रश्न अनुत्तरीत असून या विकासकाने महापालिकेच्या भूखंडावर डोळा ठेवून हे बांधकाम हाती घेतले आणि सुधार समितीने त्यांचे स्वप्न साकार केले, असे दिसून येते.


अखेर भूखंड विकासकाच्या घशात कोंबलाच!

९ मीटर रुंदीच्या या पोहोच रस्त्यासाठी महापालिकेच्या भूखंडामधून ४.५ मीटर रुंदीचा पोहोच रस्ता उपलब्ध करून देणे महापालिकेस बंधनकारक असल्याचे प्रशासनाने आधीच जाहीर केले होते. आता त्याला सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांच्यासह सर्वच पक्षांच्या सदस्यांनी सहकार्य करून महापालिकेचा भूखंड खासगी विकासकाच्या घशात कोंबला.



हेही वाचा

सत्ताधाऱ्यांच्या भूखंडांना पालिकेचे अभय ?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा