Advertisement

महापालिकेच्या जागेतून खासगी विकासकाला रस्ता!, सर्वसामान्यांच्या सुविधेचे काय?


महापालिकेच्या जागेतून खासगी विकासकाला रस्ता!, सर्वसामान्यांच्या सुविधेचे काय?
SHARES

मुंबई महापालिका जनतेला सेवा सुविधा पुरवण्यासाठी आहे की धनदांडग्या विकासकांना? असा प्रश्न आपल्या सर्वांना नेहमीच पडतो. परंतु महापालिका आपल्या कृतीतूनच हे दाखवून देत आहे. माहिममधील एका विकासकाला महापालिका आपल्या भूखंडातून रस्ता तयार करून देणार आहे. महापालिका आपले भूखंड खासगी विकासकांना अशाप्रकारे आंदण देत असल्याने सर्वसामान्यांच्या सोईचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

माहिममधील दिलीप गुप्ते मार्गावरील माहिम वाचनालयाच्या शेजारी भूभाग क्रमांक ८१ वर असलेली जुनी धोकादायक इमारत पाडून त्याठिकाणी शगुन बिल्डर्सच्या माध्यमातून पुनर्विकासाचे काम सुरु आहे. या पुनर्विकास प्रकल्पासाठी महापालिकेच्या मालकीचा भूभाग क्रमांक ८२ मधून ४.५ मीटर रुंदीचा ६० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर पोहोच मार्ग उपलब्ध करून देण्याची विनंती विकासकाच्या वास्तुशास्त्रज्ञाने केली हाेती. या विनंतीनुसार या मार्गासाठी जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी सुधार समितीच्या बैठकीपुढे ठेवण्यात आला आहे.

महापालिकेच्या भूभागावर दोन मजली इमारत असून त्यामध्ये माहिम सार्वजनिक वाचनालय आणि कर्णबधीरांची शाळा चालवली जाते. शगुन बिल्डर्सच्यावतीने केल्या जाणाऱ्या पुनर्विकास प्रकल्पाशेजारी असलेल्या भूभाग क्रमांक ८० व ८३ या भागांवर आधीच इमारती असल्यामुळे त्याठिकाणांहून त्यांना रस्ता उपलब्ध करून देता येत नाही. त्यामुळे महापालिकेच्या भूभाग क्रमांक ८२मधून रस्त्यांसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास, त्यासंबंधिचे सर्व शुल्क महापालिकेला भरण्याची तयारी विकासकाने दाखवली आहे.



का हवीय विकासकाला जागा?

भूभाग क्रमांक ८१वरील जुनी दोन मजली इमारत विकासकाने पाडली आहे. याठिकाणी ३१ भाडेकरू राहत होते. परंतु या दुमजली इमारतीच्या जागी आता २४ मीटर पेक्षा जास्त उंचीची गगनचुंबी (टॉवर) इमारत बांधली आहे. त्यामुळे इमारतीच्या आरखड्यानुसार या पुनर्विकास प्रकल्पासाठी ९ मीटर रुंदीचा रस्ता असणे बंधनकारक आहे. त्यामुळे या रस्त्यासाठी लागणारी साडेचार मीटर रुंदीची जागा महापालिकेच्या भूखंडातून देण्यात येणार आहे. माहिम वाचनालय इमारत आणि भागेश्वर भूवनमधून एक पायवाट बाहेर जाण्यास होती. ही पायवाट आता विकासकाने बंद केली असून महापालिकेने जागा देण्यापूर्वीच त्यावर विकासकाने कब्जा केलेला पाहायला मिळत आहे.


विकासकासाठी काहीही

९ मीटर रुंदीच्या या पोहोच रस्त्यासाठी ४.५ मीटर रुंदीची जागा महापालिकेच्या भूखंडावरून देताना, महापालिकेच्या भूखंडामधून ४.५ मीटर रुंदीचा पोहोच रस्ता उपलब्ध करून देणे महापालिकेस बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. मुळात विकासकाने आपल्या भूखंडावर इमारतीचे बांधकाम क्षेत्र कमी करून ९ मीटर रुंदीचा रस्ता बनवून त्याप्रमाणेच आराखडा बनवायला हवा.

परंतु याठकाणी आपल्याला जागा बंधनकारक असल्याचे महापालिका सांगत आहे. जर या ठिकाणी महापालिकेचा भूखंड नसता तर विकासकाला कुठून जागा दिली असती, असा सवाल यामाध्यमातून उपस्थित होत आहे. सुधार समिती अध्यक्ष अनंत (बाळा) नर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.



हेही वाचा -

तुकाराम पाटील यांच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर, नगरसेवकपद धोक्यात?

धक्कादायक...मुंबईतले तलाव झाले गायब! 



डाऊनलोड करा Mumbai live APP  आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा