Advertisement

तुकाराम पाटील यांच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर, नगरसेवकपद धोक्यात?


तुकाराम पाटील यांच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर, नगरसेवकपद धोक्यात?
SHARES

घाटकोपरमधील सहा अनधिकृत गाळ्यांवर शनिवारी महापालिकेने बुलडोझर चालवला. यापैकी दोन गाळे विद्यमान शिवसेना नगरसेवक आणि एन प्रभाग समितीचे अध्यक्ष तुकाराम (सुरेश) पाटील यांचे असल्याचे बोलले जात आहे. भाजपाच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी न्यायालयात केलेल्या याचिकेनंतर महापालिकेने ही धडक कारवाई केल्याचे समजते. या अनधिकृत बांधकामांमुळे सुरेश पाटील यांचे नगरसेवकपद धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.

घाटकोपरमधील सिद्धी साई इमारत दुघर्टना होण्यास जबाबदार असलेला शिवसेनेचा पदाधिकारी सुनील सितप याला अटक केल्यानंतर त्याच्या घाटकोपरमधील अनधिकृत बांधकामांचा करिष्मा उघड झाला. त्यानंतर या घाटकोपरमधील सर्व अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेने मोहीम उघडली. 

घाटकोपर इंडस्ट्रियल रोडवरील अमृतनगर चौक येथे सुमारे १२५ अनधिकृत दुकाने तसेच गाळे बांधले आहेत. या बांधकामांवर महापालिकेने लक्ष वेधले. त्यानुसार शनिवारी या भागातील सहा अनधिकृत गाळे आणि दुकानांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये नगरसेवक तुकाराम (सुरेश) पाटील यांचे दोन गाळे होते. गाळा क्रमांक ३६ आणि ३७ हे दोन गाळे पाटील यांच्या नावावरच असल्याचे समजते. हे दोन्ही गाळे त्यांनी भाडेतत्वावर चालवण्यास दिल्याचे बोलले जात आहे. या दोन्ही गाळ्यांवर शनिवारी महापालिकेच्या एन विभागाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली.



अनधिकृत गाळ्यांवर सोमवारी कारवाई

घाटकोपर इंडस्ट्रिअल रोडवरील २ गाळे, तर महिंद्रा पार्क येथील २ आणि हिंगवाला लेन येथील २ गाळ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती एन विभागाचे सहायक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी दिली. घाटकोपर इंडस्ट्रिअल इस्टेट मार्गावर एकूण १२५ अनधिकृत बांधकामे निश्चित करण्यात आली आहेत. यातील सितपच्या एका बांधकामाबाबत कागदोपत्री पुरावे पूर्णपणे तपासले जात आहेत. यातील अनेक बांधकामांबाबत न्यायालयीन प्रकरणे होती. त्यातील काही निकालात निघाली आहेत. काही रद्द झाली आहेत. त्यामुळे या सर्व अनधिकृत गाळ्यांवर सोमवारी कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही सर्व बांधकामे आजी माजी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचीच असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना नगरसेवक तुकाराम पाटील यांनी मात्र, ही बांधकामे आता आपली नसल्याचे म्हटले आहे. आपण ही बांधकामे २०१५मध्ये विकली असून त्या बांधकामांशी आपला कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

सिद्धीसाई इमारत दुघर्टनेनंतर सितप यांच्यासह नगरसेवक तुकाराम (सुरेश) पाटील यांच्या अनधिकृत बांधकामाबाबत लघुवाद न्यायालयात याचिका केली होती. पण त्याबरोबरच मुंबई उच्च न्यायालयातही याचिका केली होती. याचिकेत नगरसेवक तुकाराम (सुरेश) पाटील, महापालिका एन विभागाच्या सहायक आयुक्त यांना पक्ष केले होते. याची सुनावणी येत्या २५ सप्टेंबर रोजी होणार होती. परंतु, त्यापूर्वीच एन विभागाने ही कारवाई केली आहे. तुकाराम (सुरेश) पाटील यांचे दोन गाळे शनिवारी तोडण्यात आले आहेत. पण सितपच्या बांधकामांवर कारवाई केलेली नसून ही बांधकामेही त्वरीत तोडली जावी, अशी मागणी भाजपाच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी केली आहे.


बांधकामांप्रकरणाची याचिका २०१३मध्ये बाद

या बांधकामांप्रकरणी याचिका २०१३मध्ये बाद केली होती. जर त्यांनी दोन वर्षांपूर्वी गाळे विकले असतील तर गाळ्यांचे गुमास्ता परवान्याचे नुतनीकरण का केले? रिलायन्स एनर्जीचे बिल का भरले जाते? असा सवाल रितू तावडे यांनी केला. प्रभाग क्रमांक १२७चे नगरसेवक तुकाराम (सुरेश) पाटील यांची अनधिकृत बांधकामे असल्याची तक्रार आपण केली होती. परंतु हीच बांधकामे तोडून महापालिकेने ती अनधिकृत असल्याचं शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक लढवताना दिलेल्या घोषणा पत्रानुसार महापालिका अधिनियम १८८८च्या १६ (१) डी नुसार त्यांचे महापालिका सदस्यत्व रद्द करण्याची मागणी आपण महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे करणार असल्याचे रितू तावडे यांनी सांगितले आहे.



हेही वाचा - 

अनधिकृत बांधकामांविरोधात आबासाहेब जऱ्हाडांची धडक कारवाई

मुंबईतील 128 अनधिकृत बांधकामांवर कारवाई


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा