अनधिकृत बांधकामांविरोधात आबासाहेब जऱ्हाडांची धडक कारवाई

Mumbai
अनधिकृत बांधकामांविरोधात आबासाहेब जऱ्हाडांची धडक कारवाई
अनधिकृत बांधकामांविरोधात आबासाहेब जऱ्हाडांची धडक कारवाई
See all
मुंबई  -  

मुंबईतील अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेच्या वतीने धडक कारवाई हाती घेण्यात आली असून मागील चार दिवसांमध्येच अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात जोरदार कारवाई करण्यात आली आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर आबासाहेब जऱ्हाड यांनी उपायुक्त आणि सहायक आयुक्तांवर या सर्व अनधिकृत बांधकामांची जबाबदारी सोपवून सर्वच अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मागील तीनच दिवसांमध्ये १९८ अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवून सुमारे ३२ हजार चौरस मीटरची जागा मोकळी करण्यात आबासाहेब जऱ्हाड यांना यश मिळाले आहे.

अनधिकृत बांधकामांच्या विरोधात उपायुक्त (अतिक्रमण निर्मूलने) रणजित ढाकणे यांच्या मार्गदर्शनानुसार महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलने खात्याने २ ऑगस्टला मध्यरात्रीपर्यंत एकूण ७० व्यवसायिक स्वरुपाची अनधिकृत बांधकामे तोडली. महापालिकेच्या २४ पैकी २१ विभाग कार्यालयांच्या क्षेत्रात करण्यात आलेल्या या कारवाईत ३० हजार ७८९ चौरस फूट एवढे बांधकाम मोकळे करण्यात आले आहे.

यापूर्वी सोमवार ३१ जुलै आणि मंगळवारी १ ऑगस्ट रोजी अनधिकृत बांधकामांच्या विरोधात करण्यात आलेल्या कारवाईत एकूण १२८ व्यवसायिक स्वरुपाची अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली आहेत. महापालिकेच्या २४ पैकी १९ विभाग कार्यालयांच्या क्षेत्रात करण्यात आलेल्या या कारवाईत सुमारे २८ हजार ७४८ चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात अाल्याची माहिती सहाय्यक आयुक्त (अतिक्रमण निर्मूलने - उपनगरे)  विश्वास शंकरवार व शहर भागाचे सहाय्यक आयुक्त (प्रभारी) मधुकर मगर यांनी दिली आहे.


कोणती बांधकामे तोडली

अनधिकृतपणे बांधण्यात आलेले पोटमाळा, खोली, शेड, गॅलरीचा भाग बंद करुन तयार करण्यात आलेली खोली, गच्चीवर अनधिकृतपणे शेड टाकून तयार करण्यात आलेला मजला, अनधिकृतपणे केलेले ओट्याचे बांधकाम आदी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.


'हॉटेल बॉम्बे'सह सर्वांना दणका

या कारवाईदरम्यान 'ए' विभागातील मादाम कामा रोड वरील 'हॉटेल बॉम्बे विंटेज'चे सुमारे १०० चौ.फुटांचे अनधिकृत बांधकाम, तर 'जी दक्षिण' विभागातील कमला मिल परिसरात असलेल्या हॉटेल 'वन अवोब' व हॉटेल 'मोजो' येथील सुमारे २ हजार चौ. फुटांचे अनधिकृत शेड हटविण्यात आले आहे. ताडदेव परिसरातील 'वैद्य मॅन्शन' या इमारतीत अनधिकृतपणे बांधलेल्या सुमारे ४५० चौ.फू. खोलीचे बांधकाम, यासह शहर भागात एकूण १४ अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त मधुकर मगर यांनी दिली आहे.


हॉटेल सिगडी, माश्शादलाही दिला झटका

वांद्रे पश्चिम परिसरातील 'सिगडी' हॉटेल येथील सुमारे ५६५ चौ.फू.चे अनधिकृत बांधकाम, 'माश्शाद' हॉटेल व 'हारुन सलून'चे प्रत्येकी सुमारे ६०० चौ. फू.चे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले आहे. याशिवाय 'पी दक्षिण' विभागात 'न्यू भारत इंडस्ट्रियल इस्टेट' येथील गच्चीवर सुमारे १२०० चौ. फू. जागेवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेले शेडही तोडण्यात आली. तर 'एम पूर्व' विभागात गोवंडी परिसरातील 'युनिक हॉल' येथील सुमारे १० हजार ५०० चौ. फू. चे अनधिकृत बांधकाम यासह पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये एकूण ५६ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली.


५९१ अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

मुंबईतील शहर व उपनगरात ३१ जुलैपासून अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई करण्यात येत असून शहर आणि उपनगरातील एकूण २०३ फेरीवाल्यांना हटवण्यात आले होते. दरम्यान, बुधवारी अंधेरी पूर्व येथे सुरु असलेल्या फेरीवाल्यांविरोधातील कारवाईत सुरेन रोड, अंधेरी-कुर्ला रोड तसेच कार्डीयन ग्रेसस रोड आदी ठिकाणी के-पूर्व विभागातील महापालिका कर्मचाऱ्यांना फेरीवाल्यांकडून मारहाण झाली. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती के-पूर्वचे सहायक आयुक्त देवेंद्र जैन यांनी दिले आहे. 

धार्मिक स्थळाचे बांधकाम तोडताना शिवसेना शाखाप्रमुखाने महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई केल्यामुळे याचा निषेध म्हणून एच–पश्चिम विभाग कार्यालयात सर्व कामगार, कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आंदोलन करून निषेध नोंदवला. दरम्यान, याप्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यानुसार त्यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती एच-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांनी दिली आहे.हेही वाचा

मुंबईतील 128 अनधिकृत बांधकामांवर कारवाई


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.