बनावट शासन निर्णय सोशल मीडियावर व्हायरल

 Mantralaya
बनावट शासन निर्णय सोशल मीडियावर व्हायरल
Mantralaya, Mumbai  -  

सोशल मीडियामवर नेहमीच कोणते न कोणते फोटो, व्हिडियो व्हायरल होत असतात. मात्र मंगळवारी याच सोशल मीडियावर चक्क राज्य सरकारचा शासकीय निर्णय व्हायरल झाला. या व्हायरल झालेल्या बनावट शासन निर्णयात शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय 58 वरून 60 केल्याबाबतचे लिहिले आहे. मात्र सोशल मीडियामध्ये राज्य सरकारचा बनावट शासकीय निर्णय व्हायरल होताच राज्य सरकारला पुढे येऊन प्रसिद्धी पत्रक काढावे लागले. सोशल मीडियावर फिरत असलेला शासन निर्णय बनावट असल्याचे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. काही काळासाठी राज्य सरकारची वेबसाईटच उघडत नव्हती. त्यामुळे अशा प्रकारचा शासन निर्णय खरोखर झाला आहे की काय, याबाबतची चर्चा मंत्रायलामधील कर्मचाऱ्यांमध्ये होती.

शासन निर्णयाचा क्रमांक तसेच संकेतांक क्रमांकाचा वापर करून गट-क संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याबाबतचा बनावट शासन निर्णय क्र. अकंपा-1217/प्र.क्र.46/आठ, सोमवारी 8 मे रोजी तयार करण्यात आला असून हा बनावट शासन निर्णय सोशल मीडियावर फिरत आहे. अशा प्रकारचा शासन निर्णय हा बनावट असून असा कोणताही निर्णय अद्याप राज्य सरकारने घेतला नाही, असे प्रसिद्धी पत्रकात लिहिले आहे.

Loading Comments