Advertisement

केवळ प्रसिद्धीच फ्री! 'पॅडमन'ने केलं २० रुपयांच्या सॅनिटरी नॅपकिनचं अनावरण

'पॅडमॅन' सिनेमा रिलिज व्हायच्या आधी सॅनिटरी नॅपकिन 'टॅक्स फ्री' नव्हे, तर 'फ्री' देण्यात यावं, अशी कळकळीची मागणी करणारा अक्षय २० रुपयांच्या सॅनिटरी नॅपकिनसाठी 'फ्री'ची प्रसिद्धी मिळवताना दिसला.

केवळ प्रसिद्धीच फ्री! 'पॅडमन'ने केलं २० रुपयांच्या सॅनिटरी नॅपकिनचं अनावरण
SHARES

शेकडो चाहत्यांची गर्दी, प्रसिद्धी माध्यमांची उपस्थिती एसटी कर्मचारी आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या गराड्यात सिनेअभिनेता अक्षय कुमारने गुरूवारी संध्याकाळी मुंबई सेंट्रलच्या एस.टी. बसस्थानकातील पहिल्यावहिल्या सॅनिटरी नॅपकिनच्या मशिनचं अनावरण केलं. 'पॅडमॅन' सिनेमा रिलिज व्हायच्या आधी सॅनिटरी नॅपकिन 'टॅक्स फ्री' नव्हे, तर 'फ्री' देण्यात यावं, अशी कळकळीची मागणी करणारा अक्षय यावेळी २० रुपयांच्या सॅनिटरी नॅपकिनसाठी 'फ्री'ची प्रसिद्धी मिळवताना दिसला.


चाहत्यांची केली निराशा

हा कार्यक्रम मुंबई सेंट्रलच्या एसटी महामंडळाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अक्षय सोबतच परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. आपला आवडता अभिनेता येणार आहे, त्याची एक झलक तरी बघायला मिळेल म्हणून चाहते आणि प्रवाशांनी डेपोत मोठी गर्दी केली होती.

पण, संध्याकाळी ४.३० वाजेचा कार्यक्रम असताना अक्षय अाणि इतर मान्यवर आले थेट ५.४५ वाजता. त्यातही केवळ ५ मिनिटांत व्हेंडिंग मशिनचं अनावरण करून कार्यक्रम आटोपता घेण्यात आला. यापैकी एकाही व्यक्तीने उपस्थितांशी संवाद साधला नाही. त्यामुळे उपस्थितांची चांगलीच निराशा झाली.



३ नॅपकिन्ससाठी २० रुपये

या मशीनमध्ये एका वेळेस ५ रुपयांचे ४ कॉईन्स किंवा १० रुपयांचे २ कॉईन्स टाकायचे. पुढे एक लाल रंगाचं बटण प्रेस करायचं. त्यानंतर महिलांना मशिनमधून सॅनिटरी नॅपकिन मिळेल. एका पाकिटात ३ सॅनिटरी नॅपकिन्स असणार आहेत. म्हणजे एकूण २० रुपयांत ३ नॅपकिन महिलांना मिळतील, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेचे अध्यक्ष श्रीरंग बर्गे यांनी दिली.


महिलांना फायदा

या स्थानकांत एकूण १२ महिला कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना आणि इथे येणाऱ्या महिला प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत हे सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध होणार आहेत. शिवाय, हे एक सॅनिटरी नॅपकिन १२ तास चालू शकतं, अशी माहिती एच.एन केअर या कंपनीचे डायरेक्टर आशिष कंबोडिया यांनी दिली. 'खुशी' या संस्थेतर्फे हे सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन देण्यात आलं आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा