Advertisement

बोरिवली-माटुंगा प्रवास 130 मिनिटांचा


बोरिवली-माटुंगा प्रवास 130 मिनिटांचा
SHARES

रात्रीपासूनच झोडपून काढणाऱ्या पावसाने सकाळी मुंबईला जलमय करुन टाकले. आजवर माटुंगा भागात पाणी तुंबले जावून लोकल बंद झाल्याचे प्रकार घडले होते. परंतु, मंगळवारी चक्क वांद्रे रेल्वे स्थानकाजवळच पाणी तुंबून पश्चिम रेल्वे सेवा कोलमडली. बोरिवलीहून धिम्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 40 मिनिटांच्या प्रवासासाठी चक्क 130 मिनिटे मोजावी लागली. अत्यंत कासवगतीने सुरू असलेल्या या वाहतूक सेवेने मुंबईकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला.

मंगळवारी सकाळी 11 वाजून 13 मिनिटाला चर्चगेटसाठी रवाना झालेली लोकल राम मंदिर रोडपर्यंत सुरळीत सुरू राहिली. परंतु, जोगेश्वरी रेल्वे स्थानकापासून या लोकलच्या कासवगती प्रवासाला सुरुवात झाली. जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूझ, खार आणि वांद्रे या सर्व स्थानकांदरम्यान किमान 20 ते 25 मिनिटांचा हॉल्ट घेतल्यानंतरच गाडी पुढे सरकत होती. परंतु, वांद्रे रेल्वे स्थानकापासून या लोकलने गती पकडली आणि माटुंगा रेल्वे स्थानकावर ही लोकल 1 वाजून 24 मिनिटाला पोहोचली.

ही लोकल नियमित वेळेनुसार सकाळी 11 वाजून 54 मिनिटाला माटुंगा रोड रेल्वे स्थानकावर पोहोचायला हवी होती. परंतु प्रत्यक्षात ही लोकल दुपारी 1 वाजून 24 मिनिटाला पोहोचल्यामुळे 40 मिनिटांच्या प्रवासाला मुंबईकरांना तब्बल दोन तास दहा मिनिटे मोजावी लागली.


माटुंगा रेल्वे स्थानक पाण्याखाली

वांद्रे रेल्वे स्थानकातील रुळांवर पाणी साचल्यामुळे गाड्यांची गती कमी झाली होती. परंतु, माटुंगा रेल्वे स्थानक तसेच एलफिन्स्टन रेल्वे स्थानवरही पाणी तुंबल्यामुळे रेल्वे वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. तर मध्य रेल्वेचे शीव रेल्वे स्थानकही पाण्याखाली गेले होते, दादर रेल्वे स्थानकातही पाणी तुंबले गेले होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा