मुंबईच्या उपनगरी रेल्वे नेटवर्कवरील 37 स्थानकांमध्ये एकूण 200 ठिकाणी पश्चिम रेल्वेने (WR) सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांकडून गैरवर्तन आणि तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मिड-डेने दिलेल्या वृत्तानुसार, ही सीसीटीव्ही यंत्रणा रेल्वेच्या दक्षता (व्हिजिलन्स) विभागालाही तिकीट तपासणी प्रक्रियेवर बारकाईने नजर ठेवण्यास मदत करणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिकीट कार्यालये, बुकिंग काऊंटर आणि प्रवाशांशी थेट संपर्क येणाऱ्या ठिकाणी सुमारे 25.81 कोटींची सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात येत आहे.
हा खर्च बुकिंग आणि तिकीट काढणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित कामकाजाचे वातावरण निर्माण करण्यासाठी करण्यात येत आहे. गर्दी, भाड्याविषयक वाद आणि तिकीट नसल्यामुळे दंड आकारताना होणारे वाद विशेषतः गजबजलेल्या उपनगरी मार्गांवर या कर्मचाऱ्यांना अनेकदा आक्रमक वर्तनाला सामोरे जावे लागते.
1. PRS आणि UTS-कम-PRS केंद्रे:
29 प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) केंद्रे आणि 31 अनारक्षित तिकीट प्रणाली (UTS)-कम-PRS स्थानकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. यासाठी 7.12 कोटी खर्च करण्यात येणार आहे. यामुळे सर्वाधिक गर्दी असलेल्या तिकीट केंद्रांवरील सुरक्षा वाढणार आहे.
2. UTS स्थानके:
एकूण 68 UTS स्थानकांमध्ये सीसीटीव्ही कव्हरेज देण्यात येणार आहे. यासाठी 12.39 कोटी खर्च होणार आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, यामुळे तिकीट न काढता प्रवास करणे, धमक्या, शिवीगाळ आणि दमदाटी यांसारख्या घटनांना आळा बसेल. विशेषतः रोख रक्कम हाताळणाऱ्या बुकिंग क्लार्कसाठी ही बाब महत्त्वाची ठरणार आहे.
3. TC कार्यालये आणि TTE लॉबी:
याशिवाय, 40 हेड तिकीट कलेक्टर (TC) कार्यालये आणि ट्रॅव्हलिंग तिकीट परीक्षक (TTE) लॉबींमध्ये सुमारे 6.30 कोटी खर्चून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. उशिरा रात्री आणि गर्दीच्या वेळेत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेत वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा
