Advertisement

मुलांच्या सुरक्षेसाठी ‘चिराग’ अॅप


SHARES

बालकांचे हक्क आणि सुरक्षा या विषयासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने आतापर्यंत अनेक जनजागृती अभियाने राबवली आहेत. पण, असे असले तरीही पालकांना आणि सर्वसामान्यांना याबाबत तितकेसे गांभीर्य नाही. म्हणूनच महाराष्ट्र राज्य बाल हक्क सरंक्षण आयोगाने 'चिराग' नावाचे अॅप विकसित केले आहे. या अॅपचे उद्घाटन बुधवारी महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचे सशक्तीकरण आणि संरक्षण व्हावे, हा हे अॅप सुरु करण्यामागचा उद्देश आहे.

लहान मुलांचे हक्क, अत्याचार विरोधी कायदे हे अॅपमध्ये उपलब्ध आहेत. लहान मुलांवर होणारे अत्याचार, मुलांचे हक्क, कायद्यांबाबत विचारपूस करण्यासाठी किंवा तक्रार नोंदवण्यासाठी या अॅपचा उपयोग होणार आहे.

या अॅपवर संपर्क क्रमांक, पत्ता याची माहिती उपलब्ध होईल. या अॅपचा जास्तीत जास्त वापर करत बालकांचे हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.

बालकांचे हक्क, त्यांचे संरक्षण आणि त्यांचा विकास याची जाणीव आपल्या सर्वांना झाली, तर या मुलांना त्यांच्या पायावर उभे राहायला मदत होईल. त्यांच्याकडे दयेने नाही तर प्रेमाने बघा, जेणेकरून आपण त्यांच्यावर उपकार केले अशी भावना त्यांच्या मनात राहणार नाही. हे अॅप लहान मुलांच्या हक्कासाठी, सुरक्षेसाठी काम करणारे आहे. या योजनेबाबत आम्ही खूप सकारात्मक आहोत. रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना दत्तक घेण्याच्या योजनेवरही भर दिला जातोय.

पंकजा मुंडे, महिला व बालविकासमंत्री

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा