Advertisement

साकिनाका बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना २० लाखांची मदत जाहीर

राज्य सरकारकडून पीडितेच्या कुटुंबियांना २० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

साकिनाका बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना २० लाखांची मदत जाहीर
SHARES

अंधेरी साकीनाका परिसरात राहणारा आरोपी मोहन चौहान यानं पीडितेवर केलेल्या लैंगिक अत्याचारांमुळे संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर राज्य सरकारकडून पीडितेच्या कुटुंबियांना २० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.  

“राष्ट्रीय महिला आयोगाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. सोमवारी मुख्यमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांसोबत वर्षा निवासस्थानी बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी पीडित महिलेच्या कुटुंबियांसाठी शासकीय योजना लागू केल्या आहेत. मुख्यमंत्री निधीतून आणि शासकीय योजनांमधून पीडितेच्या मुलींना २० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे,” असं पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितलं.

यासंदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत या प्रकरणातील तपासाबाबत माहिती दिली आहे.

“पीडित महिला ही विशिष्ट समाजाची असल्यानं अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगानं तपास सुरू आहे. आरोपीनं आपला गुन्हा कबुल केला आहे आणि त्यानं गुन्हाच्या संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. घटनास्थळावर गुन्हा कसा घडला या घटनाक्रमातून सर्व पुरावे मिळाले आहेत. आरोपीकडून गुन्हासाठी वापरण्यात आलेलं हत्यार सुद्धा जप्त करण्यात आलं आहे,” असे हेमंत नगराळे यांनी सांगितलं.

दरम्यान, साकीनाका येथे महिलेवर बलात्कार होऊन त्यानंतर तिच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी सुरु केलेल्या तपासावर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने समाधान व्यक्त केलं. राज्य शासन याप्रकरणी संपूर्ण न्याय देईल असा विश्वास व्यक्त करताना आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी या घटनेत राजकारण आणता कामा नये असे देखील स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांना या घटनेच्या अनुषंगानं स्वत: चर्चेसाठी बोलावून या घटनेकडे राज्य शासन गांभिर्यानं पहात आहेत. पीडितेच्या कुटूंबास योग्य तो मोबदला देण्यात येवून तिच्या मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी देखील पार पाडण्यात येईल असं आयोगास सांगितलं.

गणेशोत्सवाच्या वातावरणात मुंबईला सुन्न करणारी घटना गेल्या आठवड्यात साकीनाका परिसरात घडली. एका ३४ वर्षीय महिलेवर टेम्पोचालकानं अमानुष लैंगिक अत्याचार केले. या महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.



हेही वाचा

धक्कादायक! मुंबईत यावर्षी जुलैपर्यंत ५५० बलात्काराचे गुन्हे दाखल

साकीनाका बलात्कारप्रकरणी 'अ‍ॅट्रॉसिटी'चा गुन्हा दाखल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा