Advertisement

'सीएम अंकल, सीएम अंकल प्लीज सेव्ह आरे'


SHARES

“जंगल मैं घर बनाओगे तो रॅबिट, लेपर्ड, डिअर सब कहाँ जायेंगे? सी एम अंकल, सी एम अंकल, प्लीज सेव्ह आरे” पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अशी आर्त साद एका व्हिडिओच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातलीय अडीच वर्षाच्या एका लहानग्याने. अजून शाळेची पायरी न चढलेल्या पण जन्मत:च पर्यावरण संवर्धनाचे बाळकडू प्यायलेल्या अर्जून मेहता या अडीच वर्षाच्या लहानग्याचा सेव्ह आरेसंबंधीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. केवळ दोन दिवसांत एक ते दीड लाख लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आहे.

अर्जूनचे वडील, जल्पेश मेहता हे पर्यावरणप्रेमी असून, गेली कित्येक वर्षे इम्पॉवर फाऊंडेशनच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे काम करत आहेत. तर वर्षभरापासून ते सेव्ह आरे ग्रुपशीही जोडले गेले आहेत. आरे वाचवणे हेच मुख्य ध्येय सेव्ह आरे ग्रुपसह जल्पेश यांचेही आहे. विकासाच्या नावावर मुंबईतील झाडांसह मुंबईचे फुफ्फुस समजल्या जाणाऱ्या आरेवर घाव घातला जाणार आहे. याचा फटका येणाऱ्या भावी पिढीला बसणार आहे. भावी पिढीचे आयुष्य सुकर करायचे असेल तर, पर्यावरणावरील हा घाला शक्य तितक्या लवकर रोखला पाहिजे. यासाठी विविध पातळ्यांवर सेव्ह आरेची लढाई सुरू आहेच पण त्याचबरोबर ज्या भावी पिढीसाठी आपण हे करतोय त्या भावी पिढीलाही याबाबतची माहिती आणि जाणिव करून देण्याच्या उद्देशाने या अनोख्या सेव्ह आरे व्हिडिओची संकल्पना आपल्याला सुचल्याचे जल्पेश यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितले आहे.

एक मिनिटाच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आमचा विकासाला विरोध मुळीच नाही पण विकास हा पर्यावरणाचे संतुलन राखत व्हावा हीच अपेक्षा असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न अर्जूनसह जल्पेश आणि सेव्ह आरेने केला आहे. एकीकडे अडीच वर्षांच्या लहानग्या अर्जूनने थेट सीएमना सेव्ह आरेची आर्त साद दिली आहे तर दुसरीकडे आता महाविद्यालयीन तरूण-तरुणींनी सेव्ह ट्री, सेव्ह आरे म्हणत रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईभर सेव्ह ट्री आणि सेव्ह आरेची चळवळ उभी ठाकली असून, आपल्या आणि आपल्यानंतरच्या भावी पिढीसाठी ही चळवळ यशस्वी होणे अत्यंत गरजेचे आहे हे जाणवले आणि त्यामुळेच सेव्ह आरे, सेव्ह ट्रीचा संदेश देत आपणही या चळवळीचा भाग व्हायला हवे, असे वाटल्याची प्रतिक्रिया के सी कॉलजेची विद्यार्थ्यींनी श्रेया जैन हिने दिली आहे.

के. सी कॉलेज आणि हिंदुजा कॉलेजच्या 40 विद्यार्थ्यांनी एकत्र येत शनिवारी एनसीपीए आणि इंटरकॉन्टीनेन्टल येथे एक पथनाट्य सादर करत सेव्ह ट्री, सेव्ह आरेचा संदेश मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. यापुढेही अशा पथनाट्य सादर करत जनजागृती करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांचा असणार असल्याचेही श्रेयाने सांगितले आहे. अर्जुनसह या कॉलेज तरूण-तरूणींनी घातलेली ही साद सरकारपर्यंत, सीएमपर्यंत पोहचते का, हेच पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. पण यानिमित्ताने भावी पिढी पर्यावरणाशी जोडली जात आहे, हे ही नसे थोडके.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा