राज्यात साजरा होणार राज्यघटना सप्ताह


SHARE

राज्यात साजरा होणाऱ्या 'राज्यघटना सप्ताह'चा मुख्य कार्यक्रम मुंबई आणि नागपूर येथे होणार असून यात राज्यातील सर्व शासकीय, निम-शासकीय कार्यालयं, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, तसंच कॉलेजांना सहभागी होण्याचं आवाहन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केलं आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या आढावा बैठकीत राजकुमार बडोले यांनी यासंदर्भात माहिती दिली.

राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, तसंच कॉलेजांमध्ये २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत 'राज्यघटना सप्ताह' साजरा करण्यात येणार आहे.


लाभार्थींना कर्जवाटप

या सप्ताहात राज्यातील अनुसूचित जातीतील दारिद्र्य रेषेखालील भूमिहिनांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेंतर्गत जमीनवाटप सुरू करण्यात येणार आहे. त्याशिवाय या सप्ताहनुसार विविध महामंडळांच्या लाभार्थींना कर्जवाटप आणि इतर महत्त्वपूर्ण उपक्रमही राबवण्यात येणार आहेत.


इत्यादी कार्यक्रम राबवणार

या सप्ताहामध्ये राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि कॉलेजांतील विद्यार्थी सहभागी होऊन राज्यघटनेच्या उद्देशिकेचे समूहवाचन करणार आहेत. त्याशिवाय या सप्ताहात राज्यघटनेवर आधारित निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य, प्रश्नमंजुषा, चर्चासत्र इत्यादी कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.

या सप्ताहानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा समाज कल्याण कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने चर्चासत्राचं आणि विशेष प्रसिद्धी मोहिमेचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती बडोले यांनी दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या