Advertisement

तुम्हीच पाठवा विजेचं रिडिंग, ऊर्जामंत्र्यांचं ग्राहकांना आवाहन

ग्राहकांनीच जर मोबाईल अॅपद्वारे रिडिंग पाठविलं, तर त्यांना रिडिंगनुसार बिल उपलब्ध करून देता येईल, असं म्हणत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज ग्राहकांनाच रिडिंग पाठवण्याचं आवाहन केलं आहे.

तुम्हीच पाठवा विजेचं रिडिंग, ऊर्जामंत्र्यांचं ग्राहकांना आवाहन
SHARES

कोरोनामुळे काही वेळा महावितरणला रिडिंग घेणं शक्य होत नाही. त्यामुळे ग्राहकांनीच जर मोबाईल अॅपद्वारे रिडिंग पाठविलं, तर त्यांना रिडिंगनुसार बिल उपलब्ध करून देता येईल, असं म्हणत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (nitin raut) यांनी वीज ग्राहकांनाच रिडिंग पाठवण्याचं आवाहन केलं आहे.

मंत्रालय इथं वीज बिल व थकबाकी यासंदर्भात पार पडलेल्या बैठकीत डॉ. नितीन राऊत यांनी वीज ग्राहकांच्या तक्रारी तात्काळ सोडविण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेला संवेदनशीलरित्या काम करण्याचे निर्देश दिले.

अॅपचा वापर करा

ग्राहकांना ऑनलाईन व मोबाईल अॅपद्वारे तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरीपण जे ग्राहक याचा वापर करू शकत नाही त्यांच्यासाठी स्थानिक कार्यालयात ऑफलाईन तक्रारी नोंद करून घेण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश ऊर्जामंत्र्यांनी यावेळी दिले.

हेही वाचा- सक्तीची वीजबिल वसुली थांबवा, कष्टकऱ्यांना मदतीचं पॅकेज द्या- देवेंद्र फडणवीस

स्वत:च रिडिंग पाठवा

कोरोना काळात रिडिंग न घेता बिलं पाठविल्याच्या ग्राहकांनी तक्रारी केल्या आहेत. म्हणून शक्यतो मीटर रिडिंग घेऊन वीज बिले पाठविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. कोरोनामुळे काही वेळा महावितरणला रिडिंग घेणं शक्य होत नसल्याने, ग्राहकांनी जर स्वतः मोबाईल अॅपद्वारे रिडिंग पाठविलं तर त्यांना रिडिंगनुसार बिल उपलब्ध करून देता येईल. हे बिल भरून ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावं, अशी विनंती नितीन राऊत यांनी केली. 

वीजदर कमी करण्याचे प्रयत्न

राज्यात विजेचे दर कमी करण्याठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत असून वीज खरेदी कराराचे पुनरावलोकन करण्यात येणार आहे. वीज खरेदीसाठी पॉवर एक्सचेंजमधून दररोज साधारणतः ११०० ते १८०० मेगावॅट वीज विकत घेण्यात येते. पॉवर एक्सचेंजसोबत दरासंबंधी वेळोवेळी वाटाघाटी करून स्वस्त वीज घेण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश ऊर्जामंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

मारहाणीच्या घटना खपवून घेणार नाही

ग्राहकांची सेवा हेच महावितरणचं ब्रीद असून ग्राहक महावितरणचं दैवत आहे. कोरोना काळात महावितरणचे कर्मचारी हे ग्राहकांना अव्याहत सेवा देत आहेत. थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या दुर्दैवी घटना घडत असून त्या खपवून घेतल्या जाणार नाही. महावितरण व प्रशासन हे कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.

(consumer must send their meter reading for electricity bills says maharashtra energy minister nitin raut)

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा