राज्य सरकारने सक्ती करून ४ ते ५ हजार कोटी रुपयांची वीजबिलांची वसुली ग्राहकांकडून केली आहे. तेव्हा सरकारने आता तरी वीजजोडणी तोडणं बंद करून ही वसुली थांबविली पाहिजे. सोबतच मजूर, शेतकरी, गरीब, मध्यमवर्गीय, छोटे व्यवसायी यांना मदत करण्यासाठी सरकारने तत्काळ पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
राज्य सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, कोरोनाच्या विषयावर आम्ही कधीही राजकारण केलेलं नाही. कोरोनाच्या उद्धवलेल्या परिस्थितीत आम्ही आधीही सहकार्य केलं आणि आताही करू, लोकांचंही सहकार्य राहील. पण आपली अकर्मण्यता लपविण्यासाठी राज्य सरकारने सतत केंद्र सरकारवर टीका करणं बंद केलं पाहिजे.
राज्य सरकारने सक्तीची कारवाई करून ४ ते ५ हजार कोटी रुपये वीज ग्राहकांकडून जमवलेले आहेत. आता तरी राज्य सरकारने सध्याची परिस्थिती बघता वीज कनेक्शन कापणं बंद केलं पाहिजे. राज्यात लाॅकडाऊन आणि अंशत: लाॅकडाऊन सुरू होत असल्याने लोकांच्या रोजगारावर मोठ्या प्रमाणात गदा येणार आहे. अशा परिस्थितीत वीज कनेक्शन कापण्याची मोहीम हा तुघलकी निर्णय ठरेल. म्हणून आतातरी राज्य सरकारने तात्काळ ही मोहीम थांबवावी, अशी आमची विनंती आहे.
हेही वाचा- राज्य सरकारची 'ब्रेक द चेन' नियमावली जाहीर
राज्य सरकारने सक्ती करून ₹5000 कोटींची वीजबिलांची वसुली केली.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 4, 2021
आता तरी ही वीजजोडणी तोडणे बंद करून ही वसुली थांबविली पाहिजे.
मजूर, शेतकरी, गरीब, मध्यमवर्गीय, छोटे व्यवसायी यांना मदत करण्यासाठी पॅकेजची घोषणा तत्काळ करावी.https://t.co/YUm2ZxO9Fb pic.twitter.com/M9lUQeNGBs
सोबतच समाजाताला जो गरीब आहे, मध्यमवर्गीय, छोटा व्यावसायिक यांचाही विचार राज्य सरकारने करण्याची आवश्यकता आहे. एका बाजूला लाॅकडाऊन आणि अंशत: लाॅकडाऊन चालू ठेवताना या वर्गाच्या मदतीसंदर्भात राज्य सरकारने घोषणा केली पाहिजे, काही पॅकेजेस दिले पाहिजे. सगळी नुकसान भरपाई राज्य सरकार देऊ शकत नाही, ती अपेक्षाही नाही. परंतु हा जो गरीब आणि मध्यमवर्ग आहे, यांना जगण्या आणि तगण्यापुरती मदत तरी राज्य सरकारने केली पाहिजे. राज्य सरकारने केवळ लाॅकडाऊन आणि अंशत: लाॅकडाऊन पुरतीच चर्चा न करता या आणि इतर बाबींवरही व्हावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुंबई आणि पुणे ही महत्वाची शहरे आहेतच. तिथं काळजी घेतलीच पाहिजे. पण या २ शहरांसोबत इतर शहरेसुद्धा महाराष्ट्रात आहेत. तेथील आरोग्य व्यवस्था ही राज्य सरकारकडे असते. आज रुग्णांना भरती करण्यासाठी जागा नाही, ही स्थिती अतिशय गंभीर आहे. त्याकडे लक्ष द्यावं लागेल.
हा नवीन विषाणू कसा, त्याचा महाराष्ट्रातच इतक्या वेगाने प्रसार का, तो नेमका काय परिणाम करतो आणि त्यापासून बचावासाठी काय केलं पाहिजे, मृत्यू कमी होतील म्हणून वेळीच कोणती खबरदारी घेतली पाहिजे, यावर सुद्धा प्रबोधन झालं पाहिजे, असा सल्लाही फडणवीस यांनी सरकारला दिला.
(maharashtra government must give relief package for economically poor people in lockdown demands devendra fadnavis)