Advertisement

'सूर्या' पाणी पुरवठा योजनेसाठी कंत्राटदाराची नेमणूक


'सूर्या' पाणी पुरवठा योजनेसाठी कंत्राटदाराची नेमणूक
SHARES

मुंबई महानगर प्रदेशातील अर्थात मिरा-भाईंदर आणि वसई-विरारमधील पाणी टंचाई दूर करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)कडून हाती घेण्यात आलेली 'सूर्या' पाणीपुरवठा योजना आता लवकरच मार्गी लागणार आहे. कारण 403 दशलक्ष लिटर क्षमतेच्या 'सूर्या' पाणीपुरवठा योजनेसाठी शुक्रवारी एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. मे. लार्सन अॅण्ड टुर्बो कंपनीला कंत्राट देण्यात आले असून, प्रकल्पाची पूर्ण जबाबदारी या कंपनीवर असणार आहे असे आयुक्त युपीएस मदान यांनी सांगितले आहे.

हा प्रकल्प राबवण्यासाठी एमएमआरडीएने आवश्यक त्या परवानग्या घेतल्या आहेत. तर राष्ट्रीय महामार्ग-8च्या बाजूने जलवाहिनी टाकण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची तसेच नदी आणि खाडी ओलांडून पाईपलाईन नेण्यासाठी महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाची परवानगी घेतल्याचे एमएमआरडीएने सांगितले आहे. कंत्राटदाराच्या नियुक्तीनुसार कंत्राटदाराने उदंचन केंद्र, जलप्रक्रिया केंद्र, जल शुद्धीकरण केंद्र आणि प्रयोगशाळा बांधणे अपेक्षित आहे. तर राष्ट्रीय महामार्ग-8 च्या बाजूने 88 किमी लांब जलवाहिनी टाकणेसुद्धा कंत्राटदाराची जबाबदारी असणार आहे.

1,329 कोटी किंमतीचा हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. तर हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मिरा-भाईंदर, वसई-विरार क्षेत्रात 403 दशलक्ष लिटर क्षमतेने पाणी पुरवठा होणार असल्याने येथील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वासही मदान यांनी व्यक्त केला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा